
Pune Cantonment Election : ‘पुणे कँटोन्मेंट’चा निवडणूक कार्यक्रम घोषित
कँटोन्मेंट : पुणे कँटोन्मेंट बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून, एक मे रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष आर. आर. कामत यांनी दिली आहे.
कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी तीन मार्चपर्यंत नवमतदारांना नाव नोंदवता येणार आहे. या मतदारांची यादी सहा मार्च रोजी प्रसिद्ध होईल. तसेच सैनिक मतदारांची यादी अद्ययावत करून संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येणार आहे.
त्यानंतर त्यांचाही नावाचा समावेश करण्यात येईल. नवमतदारांच्या यादीतील नावावर आठ मार्चपर्यंत आक्षेप घेता येईल. १३ व १४ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर १७ मार्च रोजी बोर्डाचे अध्यक्ष निर्णय घेतील. त्या कारवाईवर १६ मार्चपर्यंत अपील करण्याची मुदत दिली आहे. त्यावर बोर्डाचे अध्यक्ष १७ मार्च रोजी निर्णय घेतील.
१८ मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याकरिता १८ मार्च रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी अडीच ते चार वाजून ५० मिनिटांपर्यंतची वेळ दिली आहे.
२१ मार्च रोजी सायंकाळी पाचपर्यंत पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २३ मार्च रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अर्जाची छाननी करण्यात येईल. २४ मार्चला सायंकाळी चार वाजेपर्यंत अर्ज माघार घेता येईल. ३० एप्रिलला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे.
असे असतील वॉर्ड...
पुणे कँटोन्मेंट बोर्डामध्ये आठ वॉर्ड असून, त्यापैकी वॉर्ड क्रमांक एक- सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक दोन- महिलांकरिता राखीव, वॉर्ड क्रमांक तीन- सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक चार- अनुसूचित जातीकरिता राखीव (एससी), वॉर्ड क्रमांक पाच व सहा- महिलांकरिता राखीव आणि वॉर्ड क्रमांक सात व आठ- सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित केले आहे.