पारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

यवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत पोलिसांनी ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली.

यवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत पोलिसांनी ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली.

महम्मदसमीर महम्मदवारिस चौधरी (वय २३, रा. जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मारूफ रशीद अगमद (वय २९), तौसिफ रशीद खान (वय २५), रुस्तम शौहरद खान (वय ३०, तिघेही रा. जि. बल्लामपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दौंड न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पारगावच्या हद्दीत नदीपात्रात सिंचनासाठी अनेक वीजपंप बसविले आहेत. येथील सुमारे १९ पंपांची चोरी झाल्याची फिर्याद एक शेतकऱ्याने १३ जानेवारी रोजी दिली होती. त्यानंतर काही काळात शिक्रापूर पोलिसांच्या हद्दीतील एका शेतात चोरीचे वीजपंप टाकून दिल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. कर्डे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत प्रकाश लोखंडे यांच्या उसाच्या शेतात हे पंप सापडले. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला मेक्‍सिको टेंपो (क्र. एमएच ४८ टी ४९३) देखील शिक्रापूरहद्दीतच यवत पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईमध्ये चोरीला गेलेल्या मोटारी व गुन्ह्यात वापरलेला टेंपो असा मिळून ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल यवत पोलिसांनी हस्तगत केला आहे. अद्याप दोन आरोपी फरारी असल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले. 

सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या तपास पथकात, हवालदार जितेंद्र पानसरे, नाईक दशरथ बनसोडे, संदीप कदम, गणेश कर्पे, महेश बनकर, शिपाई संतोष पंडित, विनोद रासकर, विशाल गजरे, गजानन खत्री यांचा समावेश होता. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे हवालदार पुनाजी जाधव व पिंपळे जगतापचे पोलिस पाटील बाळासाहेब भुजबळ यांनी या कामी सहकार्य केले. पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवकर यांनी सांगितले.

परप्रांतीय गुन्हेगारांची साखळी...
मागील महिन्यात राहू (ता. दौंड) परिसरात वीजपंप व वीजवाहक तारांची चोरी केलेला माल यवत पोलिसांनी पकडला होता. या गुन्ह्यातील आरोपी व पारगाव गुन्ह्यातील काही आरोपी हे एकाच गावचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परप्रांतीय गुन्हेगारांची मोठी साखळी येथे कार्यरत असल्याचा संशय पोलिस व्यक्त करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Pump Theft Arrested in Pargaon Crime