साडेअठरा कोटी रुपयांचा ‘कचरा’

Electricity-Generation
Electricity-Generation

पुणे - कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने सुमारे साडेअठरा कोटी रुपये खर्च केले; पण या प्रकल्पांत वीजनिर्मिती झालीच नाही. यातील काही प्रकल्प बंद पडले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा कंत्राटदारांचे हित प्रशासन जोपासत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे आणखी सात प्रकल्प उभारण्याचा घाटही घालण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागांत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभे केले आहेत. यासाठी १६ कोटी रुपये खर्च केले असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च झाले आहेत. या संदर्भात सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार या प्रकल्पांपैकी बाणेर, हडपसर, पेशवे पार्क व कात्रज रेल्वे म्युझियम हे प्रकल्प पूर्ण बंद होते. त्यामुळे या ठिकाणी कचरा पाठविला गेला नाही आणि गॅस व वीजनिर्मितीही झाली नाही. ऑक्‍टोबर २०१५पासून हडपसर १, हडपसर २, पेशवे पार्क व कात्रज रेल्वे म्युझियम हे ४ प्रकल्प बंद आहेत. तसेच, बाणेर प्रकल्प जून २०१७ पासून बंद आहे. येरवडा, वडगाव १, वडगाव २, घोले रोड, वानवडी ५ या प्रकल्पांतून एक युनिटही वीजनिर्मिती झाली नसल्याचे वेलणकर यांनी सांगितले. 

...तरीही मिळतील ठेकेदाराला पैसे
फुलेनगर येथील बायोगॅस प्रकल्प चालविण्याच्या कामाच्या निविदेस नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तांत्रिक छाननी समितीने या निविदेच्या पूर्वगणन पत्रकात ७४५ रुपये प्रतिटन इतका दर दिला होता. यात बदल करून सुमारे ७४ लाख रुपये एकवट देण्याचे ठरविले गेले. या प्रकल्पात एक टनही कचरा पाठवला गेला नाही, तरी संबंधित ठेकेदाराला पूर्ण पैसे मिळतील, असा आरोप वेलणकर यांनी केला.

गेल्या काही वर्षांत कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांची ही दुरवस्था वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही. यामुळे नागरिकांच्या करांच्या पैशाचा कचरा होतो आहे हे दुर्दैव आहे.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

वीस प्रकल्पांपैकी सहा ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे वीजनिर्मिती होऊ शकत नाही. इतर चौदा प्रकल्पांतून वीजनिर्मिती होत आहे.
- सुरेश जगताप, प्रमुख, घन कचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com