माजी सैनिकाकडून आपत्कालीन सेवा

रमेश खरमाळे हे माजी सैनिक गेली सात वर्षे जुन्नर वन विभागात वनरक्षक पदावर काम करतात. परिसरात होणाऱ्या दुर्घटनांमध्ये त्यांनी कित्येक माणसांचे प्राण वाचवले आहेत.
Ramesh Kharmale
Ramesh KharmaleSakal

रमेश खरमाळे हे माजी सैनिक गेली सात वर्षे जुन्नर वन विभागात वनरक्षक पदावर काम करतात. परिसरात होणाऱ्या दुर्घटनांमध्ये त्यांनी कित्येक माणसांचे प्राण वाचवले आहेत. जखमी वन्यजीवांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठीही ते खूप धावपळ करतात. ओसाड जागी वृक्षारोपण व संवर्धनाबाबत भरीव कार्य त्यांनी, पत्नी स्वातीच्या मदतीने केलं आहे.

माळशेज घाटात एसटी दरीत कोसळल्याने मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांचे मृतदेह काढण्याची घटना असो किंवा कुकडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना जीवदान देण्याचा प्रसंग, खरमाळेंचा तत्पर सहभाग अशा आपत्कालीन मदतकार्यात नेहमीच असतो. ते म्हणाले, ‘‘भारतीय सैन्यात १७ वर्षे सेवा बजावून मी नऊ वर्षांपूर्वी निवृत्त झालो. दोन वर्षांनंतर जुन्नर वनविभागात वनरक्षक म्हणून कामाची संधी मिळाली. या पदावरील जबाबदारी पार पाडत आजवर अनेक माणसं, वन्य प्राणी व पक्ष्यांचा जीव वाचवता आला.’’

Ramesh Kharmale
पुणे जिल्ह्यात आज नवीन १०० कोरोना रुग्ण; एकूण १ हजार ६९० सक्रिय

खरमाळे यांनी स्पष्ट केलं की, जुन्नर परिसरात गडकिल्ले पाहण्यासाठी पुष्कळ पर्यटक येतात. त्यांपैकी काही अपघाताने दरीत कोसळतात. जवळपासच्या गावांमधील कुणी कधी विहिरीत पडतात. अशा वेळी जीवरक्षकांचा चमू बचावकार्य करतो. अनेकवेळा माझा त्यात सहभाग राहिला आहे. एकदा परदेशी पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला झाल्यावर त्यांना वाचवलं. विहिरीत पडलेल्या ३२ बिबट्यांना जीवदान देण्यासाठीच्या चमूत मी होतो. खेडमधील एक छोटा मुलगा हरिश्चंद्र गडावर तीन दिवस भटकत होता. त्याबद्दल कळल्याबरोबर रात्रीतून त्याला शोधून नातेवाइकांच्या स्वाधीन केलं.

गंभीर आजार किंवा अपघातग्रस्त गरजूंना, वैद्यकीय उपचारांसाठी समाजमाध्यमांवरून मदतीचं आवाहन करून सुमारे ३० लाख रुपये मिळवून देऊ शकलो. परिसरातील ओसाड जमिनीवर स्वखर्चाने कधी रोपं लावली तर कधी बिया पेरल्या. धामणखेल डोंगरमाथ्यावर सलग साठ दिवसांत पावसाचं पाणी रोखण्यासाठी, पत्नीसोबत ७० समतल चर खणले. मुलगी वैष्णवी व मुलगा मयुरेश, हेही सुटीच्या दिवशी निसर्गसंवर्धनासाठी आमच्या कामात मदत करतात. सेनादलात असताना मनावर बिंबवलं गेलं की, देशासाठी निःस्वार्थपणे सेवा दिली पाहिजे. मदतकार्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. प्रसंगी स्वतःच्या जिवावर उदार होऊन मायभूमीतील लोकांचं संकटातून रक्षण करण्यासाठी सज्ज राहायला हवं. जीवरक्षणासाठी तिथे मिळालेलं प्रशिक्षण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com