सायबर गुन्हेगारांचा ‘इमोशनल पॅटर्न’;बनावट फेसबुक खात्याद्वारे फसवणूक

पांडुरंग सरोदे - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी आता पुन्हा त्याच जुन्या ‘इमोशनल पॅटर्न’ला सुरूवात झाला आहे. शहरातील नागरिकांचे बनावट फेसबुक खाते तयार केले जात आहे.

पुणे - ‘‘मी मोठ्या संकटात सापडलो आहे. मी आजारी असून, पैशांची गरज आहे. तुम्हाला जेवढे शक्‍य असतील, तेवढे पैसे माझ्या बॅंक खात्यावर तत्काळ पाठवून द्या..’’ खासगी बॅंकेमध्ये काम करणाऱ्या अक्षय पवार या तरुणाच्या नावाने तयार केलेल्या बनावट फेसबुकवरील मेसेजद्वारे त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करणारा संदेश गेला.

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

एका मित्राने मेसेजला प्रतिसाद देत एक हजार रुपये पाठविले; मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते गेले नाहीत. तोपर्यंत अक्षयच्या अन्य मित्रांनी त्याच्यापर्यंत हा प्रकार पोचविला. अशा पद्धतीने नागरिकांच्या फेसबुक खात्याशी मिळते-जुळते बनावट फेसबुक खाते बनवून फसवणूक करण्याचा सायबर गुन्हेगारांचा ‘इमोशनल पॅटर्न’ पुन्हा सुरू झाला आहे.  ‘मी आजारी आहे’, ‘मी संकटात सापडलो आहे’ किंवा ‘आम्ही सहकुटुंब बाहेर फिरण्यासाठी आलो असताना आम्ही एके ठिकाणी अडकलो आहोत’ अशी बतावणी करून त्यापुढे ‘मला आर्थिक मदतीची गरज आहे. कृपया मला मी दिलेल्या बॅंक खात्यावर त्वरित पैसे पाठवून द्या’’ अशी भावनिक साद मेसेंजरद्वारे घातली जात असे. त्यामुळे नागरिकही काही वेळातच संबंधित नागरिकाच्या बॅंक खात्यावर पैसे पाठवीत. मात्र समोरील व्यक्तीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसे. त्यामुळे पैसे पाठविणारी व्यक्ती आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फोन करून त्याच्याकडे विचारणा करीत असे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी आता पुन्हा त्याच जुन्या ‘इमोशनल पॅटर्न’ला सुरूवात झाला आहे. शहरातील नागरिकांचे बनावट फेसबुक खाते तयार केले जात आहे. त्यानंतर पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. सायबर पोलिसांकडे याप्रकरणी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत.  

अशी घ्या काळजी 
बनावट फेसबुक खाते तयार झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार  दाखल करा.
फेसबुकवरील मेसेज पाहून पैसे पाठवू नका.
मेसेंजरद्वारे पैशांची  मागणी करणाऱ्याची पडताळणी करा.
ज्यांच्या नावाने पैसे मागण्यात आले आहेत, त्यांच्याशी थेट बोलून पुढील कार्यवाही करा.
अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

माझ्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानंतर त्यातील मेसेंजरद्वारे मित्रांकडे आर्थिक मदत मागणारे मेसेज पाठविले. एका मित्राने पैसे पाठविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, ते गेले नाहीत. त्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार केली.
- अक्षय पवार, तक्रारदार

बनावट फेसबुक खाते तयार करून फसवणुकीच्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणांचा तपास केला जात आहे. नागरिकांनीही सजग राहून कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी आर्थिक देवाण-घेवाण करू नये.
- राजकुमार वाघचौरे,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emotional patterns to deceive citizens from cyber criminals