
उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवनेसह पुर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत पैशांचा चुराडा होताना दिसतो आहे.
लोणी काळभोर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन चार गुंठे विकू पण समोरच्याची जिरवूच या विचारातून बहुतांश तरुणाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर शिंदवनेसह पुर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत एका मताला हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांचा बाजार फुटल्याची चर्चा आहे.
"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार
उरुळी कांचन, लोणी काळभोर शिंदवनेसह पुर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलेल्या उमेदारांना पैशापैक्षाही, त्यांची प्रतिष्ठा मोठी वाटू लागल्याने, पुर्व हवेलीमधील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार एक एका मतासाठी हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मोजत असल्याची चर्चा आहे. पुर्व हवेलीमधील इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत उरुळी कांचमध्ये मताला सर्वाधिक बाजारभाव पुटल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत पंच्चावन्न उमेदवारांच्याकडून किमान दहा ते बारा कोटी चुराडा होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेवढ्या चर्चेच्या असतात तेवढ्याच त्या खर्चाच्याही असतात. निवडून येणे हाच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेऊन, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपआपल्या प्रभागांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने, आश्वासने, तसेच पैशांचे वाटप आणि पाटर्यां सुरू आहेत. लोकशाहीत या अशा गोष्टी चुकीच्या आहेत. निवडणूक आयोगाने याला प्रतिबंध घालायला हवे.
हवेली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पूर्व हवेलीतील मोठ्या ग्रामपंचायतीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, थेऊर, उरुळी कांचन या ठिकाणी सध्या ग्रामपंचायतीच्या आखाड्यात प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांकडून प्रचार पत्रके, बैठका, प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, अनेक गावात अनेकांना गटागटाने हॉटेल धाब्यावर जेवणावळी दिल्या जात आहेत. मोठ्या ग्रामपंचायतीत व ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत आहे अशा अटीतटीच्या ठिकाणच्या लढतीत मतांसाठी अर्थपूर्ण व्यवहार केला जातोय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका एका मताला महत्व असल्याने एखाद्या गटातील, भावकीतील, तसेच एखाद्या घरातील दोन -चार मते सुद्धा खूपच महत्वाची असतात. या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी कोणतीही कसर उमेदवारांकडून सोडली जात नाही. त्यामुळे मतदारांची इच्छा उमेदवार पूर्ण करताना सर्रासपणे दिसत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला दोनच दिवस राहिल्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच हॉटेल हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. सर्वच हॉटेल व ढाब्यावर दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर काही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. काही हॉटेलमध्ये मद्य विक्रीला परवानगी नसताना सहज मद्य मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा त्रास वाढला आहे.