पर्यावरण संतुलित सोसायटीस कर सवलत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

गेल्या महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. महापौर राहुल जाधव पीठासीन अधिकारी होते. आदर्श पर्यावरण सोसायटी बक्षीस योजनेसाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे १२ ते १०० आणि त्यापेक्षा अधिक फ्लॅट, बंगलो, रो-हाउस असलेल्या सोसायट्या असे दोन गटांत वर्गीकरण केले जाणार आहे. त्यात शंभर टक्के कचरा वर्गीकरण व प्रक्रियेस ३० गुण; पाणीसंवर्धन, पुनर्चक्रण व पुनर्वापरासाठी २० गुण; सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी दिवे वापरासाठी १५ गुण; वृक्षारोपण, संवर्धन व लॅंड स्केपिंगसाठी २० गुण आणि पर्यावरणपूरक नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी १५ गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार पाच स्टार प्राप्त तीन सोसायट्यांना प्राप्त गुणांच्या आधारे करात सवलत दिली जाणार आहे.

रेटिंग, गुणांक व सवलत
शहर स्तरावरील सोसायट्यांना स्टार रेटिंग दिले जाणार आहे. त्यात ८६ ते १०० गुण प्राप्त सोसायट्यांना पाच स्टार दिले जाणार आहेत. त्यातील प्रथम क्रमांकास २५ टक्के, द्वितीय क्रमांकास २० टक्के व तृतीय क्रमांक प्राप्त सोसायटीस १५ टक्के सामान्य करात सवलत मिळणार आहे. तसेच, शहर स्तर वगळून सोसायट्यांतील ६६ ते ७५ गुण मिळाल्यास तीन स्टार दिले जातील. त्यांना पाच टक्के कर सवलत मिळेल. ७६ ते ८५ गुण मिळाल्यास चार स्टार व सात टक्के कर सवलत आणि ८६ ते १०० गुण मिळाल्यास पाच स्टार आणि १० टक्के कर सवलत मिळेल. 

अशी आहे योजना
आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांसाठी आहे. शहर पातळीवरील स्पर्धेत निवड झालेल्या सोसायटीसाठी केवळ दोनच वेळेस पारितोषिक दिले जाईल. तपासणी केलेल्या आर्थिक वर्षात ३० जूनअखेर थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकती कर सवलतीस पात्र असतील. क्षेत्रीय कार्यालयनिहाय सोसायटींच्या तपासणी पथकात दोन महापालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी व एक पत्रकार यांचा समावेश असेल.

Web Title: Environmental Societies Tax Concession