esakal | गारुडकर दांपत्याने झाडाला दिले गणेशाचे रूप 
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh

 दहिटने (ता.  दौंड) येथील गारुडकर दांपत्यांनी झाडाला गणेशाचे स्वरूप देऊन पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली आहे. पाच दिवस वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीचा अभिनव उपक्रम या कुटुंबीयांनी राबविला आहे. 

गारुडकर दांपत्याने झाडाला दिले गणेशाचे रूप 

sakal_logo
By
सोमनाथ भिले, सकाळ वृत्तसेवा

डोर्लेवाडी (पुणे) :  दहिटने (ता.  दौंड) येथील गारुडकर दांपत्यांनी झाडाला गणेशाचे स्वरूप देऊन पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली आहे. पाच दिवस वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीचा अभिनव उपक्रम या कुटुंबीयांनी राबविला आहे. 

दहिटणे येथील राहुल गारुडकर व संपदा गारुडकर या उच्चशिक्षित दांपत्यांनी आपल्या घरात गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता, परसबागेतील नारळाच्या झाडाला कागद, कापड, रंग आदी साहित्यांचा वापर करून सुंदर, असे मुक्त गणेशाचे स्वरूप दिले आहे. त्या ठिकाणीच विधिवत पूजा करून पाचदिवसीय उत्सवाला सुरवात केली आहे. शिवाय या पाच दिवसांत प्रत्येक दिवशी एका झाडाचे रोपण करून त्याचे संवर्धनाचा संकल्प करण्यात येणार आहे. 

"मी दगडात नाही, मंदिरात नाही, तर मी आपणा सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या, सर्वांना जीवनावश्‍यक ऑक्‍सिजन देणाऱ्या, कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेणाऱ्या, औषधे पुरवणे, महापूर थांबविण्याचे काम करणाऱ्या, पाऊस अन्‌ दुष्काळी परिस्थितीवर मात करणाऱ्या, एकूणच पृथ्वीचे तापमान नियंत्रित करून जीवसृष्टी अबाधित ठेवणाऱ्या झाडामध्ये देव असून, आपण वृक्षारोपण करून गणेशोत्सव साजरा करणे आवश्‍यक असल्याचे विविध संदेश गारुडकर कुटुंबांनी या ठिकाणी लिहून ठेवले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला वडील रघुनाथ व आई कल्पना यांनीही साथ दिली आहे 
 
पर्यावरण वाचवा 
"पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. त्याचा सामना करायचा असेल, तर आपल्याला पर्यावरण वाचविणे खूप गरजेचे आहे. एकवेळ आपण तंत्रज्ञानाशिवाय जगू शकतो, मात्र आपल्याला पुढील पिढी सुखाने जगावायची असेल तर पर्यावरण वाचविणे खूप गरजेचे आहे. यापुढील सण, उत्सव आम्ही सर्व कुटुंब वृक्षारोपण करून साजरे करणार असल्याचे मत राहुल व संपदा गारुडकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

loading image
go to top