कोरोनाच्या लढाईतही या तालुक्‍यात रंगलाय राजकीय कलगीतुरा 

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 5 May 2020

जगभरात कोरोनाची लढाऊ सुरू असताना इंदापूर तालुक्‍यात मात्र राजकीय लढाईचे रंग भरू लागले आहेत.

इंदापूर (पुणे) : जगभरात कोरोनाची लढाऊ सुरू असताना इंदापूर तालुक्‍यात मात्र राजकीय लढाईचे रंग भरू लागले आहेत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करताना सोशल डिस्टनन्सिंग व लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केला आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत राज्यमंत्री भरणे हे कायम जनतेसमवेत राहिले आहेत,' असे उत्तर दिले आहे. 

मदिरेच्या पुजाऱ्याची म्हणजेच तळीरामाची अमरकथा

राज्यमंत्री भरणे हे गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करत आहे. त्यावेळी मोठी गर्दी होत आहे. त्यावर भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""जीवनावश्‍यक किट वाटप करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. या गर्दीत कोरोनाबाधित सायलेंट व्यक्ती आल्यास त्याचा गंभीर परिणाम इतर नागरिकांवर होण्याची शक्‍यता आहे, याची जाणीव मंत्र्यांनी ठेवणे अतिशय गरजेचे आहे. जनतेला जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट वाटप न करता घरपोच करता येते. पण, केवळ प्रसिद्धी वाढविण्यासाठी हे जाहीर उपक्रम केले जात आहेत. बावडा, वकीलवस्ती, लुमेवाडी येथे सोमवारी (ता. 4) सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत मंत्री भरणे यांनी किटचे वाटप केले. बावडा गावामध्ये तर किटचे वाटप करत असताना गर्दी पांगवण्यासाठी जनतेवर पोलिस बळाचा वापर करावा लागला. मंत्री स्वतःला प्रसिद्धी व राजकीय लाभ मिळविण्यासाठी तालुक्‍यात जीवनावश्‍यक वस्तूच्या किटचे वाटप करीत आहेत. त्यामुळे जनतेला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शेडे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ""कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत राज्यमंत्री भरणे हे कायम जनतेसमवेत राहिले आहेत. त्यांनी तालुक्‍यात चार बैठका घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी काळजी घेतली. त्यामुळे एक अपवाद वगळता आतापर्यंत तालुका कोरोनामुक्त आहे. त्याची दखल घेऊन भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. या उलट भाजपचे नेते घरात बसले असून, त्यांनी या गंभीर परिस्थितीत जनतेस वाऱ्यावर सोडले आहे. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even in the battle of Corona, the political turban was painted in this taluka