
- तळीराम अमर आहे!...म्हणून दारुड्याला तळीराम म्हणतात
मदिरेच्या पुजाऱ्याची म्हणजेच तळीरामाची अमरकथा
पुणे : एकदा घेतलेली पदवी जन्माची चिकटते, एकदा लग्न केले की बायकोचा लबेदा आयुष्यभर बिलगतो... पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही. मग दारूच वाईट का. दारू ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे...
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मदिरेचे हे महामहात्म्य सांगणारा दुसरा कुणी नाही, तर तळीराम आहे. त्याने सांगितलेलं हे महात्म्य एवढं अगाध आहे की सदासर्वकाळ आपला भोवताल व्यापून राहिलेलं आहे. म्हणूनच या महात्म्याची पारायणं करणाऱ्या माणसाला आजही तळीराम म्हटलं जातं. कोण आहे हा तळीराम? दारू प्यायलेला माणूस दिसला की ग्राम्य भाषेत त्याला बेवडा म्हटलं जातं आणि सभ्य भाषेत तळीराम म्हटलं जातं. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने पुन्हा सुरू झाल्यानं हा शब्द माध्यमांतून चर्चिला जाऊ लागला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तर दारूड्याला तळीराम का म्हणतात? कोण हा तळीराम?... तळीराम अजरामर केलाय तो राम गणेश गडकरी यांनी. त्यांच्या एकच प्याला नाटकातील हे एक पात्र आहे. दारू कैफ म्हणजे त्याच्यासाठी अमृतासमान. दारूनं वाटोळं होतं, हे त्याला मान्य नाही. प्रेमापेक्षाही दारू सर्वार्थाने श्रेष्ठ आहे, असे त्याचा ठाम विश्वास आहे. मदिरेच्या कैफाने त्याच्या मेंदूपर्यंत पोचला की तिच्या प्रेमात तो आकंठ डुंबत राहतो आणि तिचे गोडवे चवीनं गात राहतो.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तळीराम 'बैठकी'ला बसला की समोरच्या माणसाला दारू महात्म्य सांगू लागतो. अशाच एका 'बैठकी'त भगीरथाला तो सांगतो, भगीरथ, दारूबद्दल बडबडणारांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी माहीत नसतं! बरं, मी म्हणतो, सुटत नाही, असंच गृहीत धरून चाला की, खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता, आणि ती जन्माची चिकटते खरी! म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको! एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो ना? म्हणून बायका करायचं टाकलं का आहे? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का?
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भगीरथचा समज असा की पदवीनं आणि बायकोनं वाईट असं का होतं? सुंदर स्रियांच्य प्रेमापुढे या मदिरेची काय किंमत? त्याच्या या समजाला तळीराम क्षणात ध्वस्त करतो. तो म्हणतो, "प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळया जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वत:लाच मदिराक्ष बनता येतं. बोला!
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तळीरामाचं हे तत्त्वज्ञान एवढ्यावरच थांबत नाही. दारू ही नीतिमत्तेलाही पोषक असते, असा दृष्टांत तो देतो. तो असा, "मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!"
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आता दारूची एवढी महती ज्यानं पेरली आहे, त्याचा विसर तरी दारू पिणाऱ्याला कसा पडणार? म्हणूनच तळीरामाचं हे तत्त्वज्ञान ते आजच्या काळातही जपून आहेत. मद्याच्या नशेसारखं ते आजही त्यांच्यामध्ये ते दरवळत आहे. म्हणूनच तळीराम हा अमर आहे.