

एव्हरेस्ट आणि मी...
अवघ्या पाचशे मीटरवर एव्हरेस्टचा माथा दिसत होता. काही तासांत जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होणार, या विचाराने अंग रोमांचित झाले होते; पण त्याच वेळी माझा सहकारी पसांग शेरपा म्हणाला, “सर, आज क्लायमेट अच्छा नही है, कल आएंगे तो अच्छा होगा.” हे शब्द ऐकून मन सुन्न झाले. पायाच्या बोटावरील जखमेच्या वेदना असह्य झाल्या होत्या, समोर एव्हरेस्ट खुणावत होता आणि सहकारी परत फिरण्याचा सल्ला देत होता.
काही क्षणांच्या शांततेनंतर पसांगने जीवनाला दिशा देणारे वाक्य उच्चारले. ‘‘सर, एव्हरेस्ट कल भी यही था, आज भी यही है और आगे भी यही रहेगा. लेकिन अपनी जान बची रहेगी तो हम फिर आएंगे.’’ त्या शब्दांनी वास्तवाची जाणीव करून दिली. जड अंतःकरणाने परतीचा निर्णय घेतला. एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात ६ एप्रिल २०२६ रोजी झाली. माझ्यासोबत पत्नीही बेस कॅम्पपर्यंत आली होती. काठमांडूमध्ये अनुभवी शेरपांच्या मार्गदर्शनाखाली माझे एव्हरेस्टसाठी नोंदणी झाली. शरीराला उंचीशी जुळवून घेण्यासाठी विविध टप्प्यांवर मुक्काम करणे आवश्यक होते. लुकला, फाकडिंग, नामचे बाजार, पेंगबोचे, डेंगबोचे आणि लोबोचे असा प्रवास करत आम्ही १६ एप्रिल रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलो. तेथून माझी पत्नी कऱ्हाडला परतली आणि माझा खरा साहसी प्रवास सुरू झाला.
एव्हरेस्ट चढाई म्हणजे केवळ शिखर सर करणे नव्हे, तर निसर्गाशी समतोल साधत केलेला संयमाचा प्रवास आहे. बेस कॅम्पवरील चार दिवसांच्या मुक्कामात खुंबू आइसफॉल, पुमोरी हाय कॅम्प आणि लोबोचे परिसरातील सहा-सात हजार मीटर उंच ठिकाणी चढ-उतार करण्याचा सराव झाला. बर्फाळ प्रदेशातील विशेष पोशाख, क्रॅम्पॉन्स, दोरखंड आणि दऱ्या पार करण्यासाठी लावलेल्या शिड्यांचा वापर यांचा सराव तितकाच महत्त्वाचा होता. १७ एप्रिलच्या रात्री बेस कॅम्पवरून पुढील चढाई सुरू झाली. हिमालयातील चढाई बहुधा रात्री केली जाते, कारण दिवसा वाढलेल्या तापमानामुळे बर्फ वितळून दरडी कोसळण्याचा धोका असतो. सुमारे सात-आठ तासांच्या चढाईनंतर आम्ही कॅम्प टूला पोहोचलो. उंची वाढत गेली तसे शरीराला ऑक्सिजनची कमतरता अधिक जाणवू लागली. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विश्रांती घेणे आवश्यक होते. १९ एप्रिलला कॅम्प थ्रीवरून निघून आम्ही कॅम्प फोरच्या दिशेने मार्गक्रमण केले आणि २० एप्रिलच्या सकाळी कॅम्प फोरला पोहोचलो. विश्रांतीनंतर रात्री आठ वाजता अंतिम समिटसाठी प्रस्थान केले. उभी, खडतर आणि अत्यंत धोकादायक चढण पार करताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. सर्व मार्गावर सुरक्षा दोरखंड लावलेले होते. पाठीवर आवश्यक साहित्याचे आठ-दहा किलो वजन होते; पण उंची वाढत गेली तसे ते दुप्पट भासत होते.
याच दरम्यान शूजच्या घर्षणामुळे पायाच्या बोटाला झालेली छोटी जखम त्रासदायक ठरू लागली. वेदना वाढत होत्या. थकवा जाणवत होता. त्या उंचीवर चालण्याचा वेग कमी झाला की वेळेचे गणित बिघडते. सोबतचा ऑक्सिजन मर्यादित असतो. एका बाजूला तीन हजार मीटर खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला वेळेची शर्यत होती. अशा परिस्थितीत थांबणे किंवा मागे वळणे याशिवाय पर्याय उरत नाही. आम्ही समिटपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर होतो. मात्र, हवामान अचानक बदलू लागले होते. माझा वेग मंदावल्याने सकाळी दहा वाजण्यापूर्वी शिखर गाठणे शक्य होणार नाही, असा अंदाज पसांगने व्यक्त केला. एव्हरेस्टमध्ये ठराविक वेळेनंतर पुढे जाणे अत्यंत धोकादायक मानले जाते. विशेषतः उतरताना बहुतेक अपघात होतात. अनुभवी शेरपा म्हणून पसांगचा सल्ला महत्त्वाचा होता.
मी परत फिरण्यास तयार होत नव्हतो. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, “सर, हम आज समिट नहीं कर पाएंगे. लेकिन एव्हरेस्ट कहीं जाने वाला नहीं है. आपकी जान बची रहेगी तो आप फिर कभी भी आ सकते हो.” अखेर त्याच्या अनुभवासमोर माझी जिद्द नमली आणि मी परतीचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशीही हवामान अनुकूल झाले नाही. त्यामुळे कॅम्प टू, बेस कॅम्प, लुकला आणि काठमांडू असा प्रवास करत ३० एप्रिल रोजी मी सुखरूप कऱ्हाडला परतलो. शिखर सर करता आले नाही, याची खंत मनात होती; पण एव्हरेस्टचे विराट, भव्य आणि मनोहारी रूप जवळून पाहण्याचे भाग्य लाभले होते. त्या पर्वतासमोर मनोभावे नतमस्तक होत मी त्याचा निरोप घेतला.
या मोहिमेतून एक महत्त्वाचा धडा मिळाला. एव्हरेस्टवर पोहोचणे ही अर्धी लढाई असते; पण सुखरूप बेस कॅम्पला परत येणे हीच खरी विजयगाथा असते. एका एव्हरेस्टवीराचे वाक्य आजही मनात कोरलेले आहे. ‘‘शिखरावर पोहोचणे अर्धी लढाई; पण बेस कॅम्पला जिवंत परत येणे म्हणजे खरी लढाई; तोच खरा एव्हरेस्टवीर.’’
- दीपक बेलवलकर, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.