घोडगंगा कारखान्याच्या उपाध्यक्षपदी माजी सैनिकाला संधी 

प्रताप भोईटे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी माजी सैनिक ऍड. रंगनाथ भागाजी थोरात यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. 

न्हावरे (पुणे) : येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी माजी सैनिक ऍड. रंगनाथ भागाजी थोरात यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांनी दुसऱ्या संचालकाला उपाध्यक्ष होण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी अजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे अध्यक्ष आमदार ऍड. अशोक पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सर्वानुमते थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या वेळी आमदार पवार म्हणाले, ""कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच गटात प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने उपाध्यक्षपदाची संधी देऊन सत्तेचा समतोल साधला जाईल, असा शब्द देण्यात आला होता. त्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यात थोरात यांची निवड करून त्यांच्या रूपाने शिरूर- टाकळी हाजी गटाला संधी दिला.''

""मी मागील वीस वर्षांपासून आमदार पवार व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी मला उपाध्यक्षपदाच्या रूपाने निष्ठेचे फळ दिले,'' अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी संतोष रणदिवे, बाबासाहेब फराटे, प्रा. सुभाष कळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. वसंतराव कोरेकर, प्रा. गोविंदराजे निंबाळकर, राजेंद्र गावडे, कुकडी कारखान्याचे संचालक ऍड. निवृत्ती वाखारे, ऍड. रवींद्र खांडरे, मनीषा सोनवणे, शंकरराव फराटे, पोपटराव भुजबळ, वाल्मीकराव नागवडे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, ऍड. सयाजीराव गायकवाड, ऍड. युनूस मणियार उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-serviceman appointed as Vice President of Ghodganga Sugar Factory