EXCLUSIV : इतरांना बंदी, दिल्लीच्या महिला खेळाडूला पुण्यात सरावाची संधी!

 International table tennis player, women player, Pune, Delhi, Sport Ministry
International table tennis player, women player, Pune, Delhi, Sport Ministry

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा क्रिडा क्षेत्रालाही मोठा फटका बसलाय. मार्चपासून खेळाच्या मैदानावर शांतता पसरली आहे. लॉकडाउनमधून हळूहळू अनलॉकिंग होत असताना खेळही लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे. अनलॉकिंगच्या सुरुवातीच्या काळात  एकट्याने व्यायाम करायला, चालायला किंवा सायकलिंग करायला परवानगी देण्यात आली असली तरी खेळांच्या सरावांना मात्र अद्यापही परवानगी नाही. मात्र मूळच्या दिल्लीच्या एका क्रीडापटूला पुण्यात सरावाची खास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात थेट केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिज्जू यांच्या एका सचिवाने पुण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे समजते.  लॉकडाऊनच्या काळात जीम, जलतरण तलाव, स्पोर्टस क्लब यांना बंदी आहे. अद्याप ही बंदी उठलेली नाही. आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी अनेक खेळांच्या संघटनांकडून करण्यात येत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

जे खेळाडू 'Elite' आहेत, अशांना तरी फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य निकष  पाळून परवानगी द्यावी, अशी विनंती काही खेळाडू करत आहेत. पण त्यांनाही ही परवानगी देण्यात आलेली नाही. एका बाजूला खेळाडूंवरील निर्बंध आणखी काही वेळ तसेच राहणार असे संकेत मिळत असताना पुण्यात एका मान्यवर शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या टेबल टेनिस हॉलमध्ये एक महिला खेळाडू सराव करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या खेळाडूबरोबर अन्य काही खेळाडूही याठिकाणी सराव करत असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खेळाडू मुळची दिल्लीची असून या सरावाची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याचे काही पोलिस तिथे गेले होते. त्यांनी संबंधित खेळाडूला हा सराव थांबवण्यास सांगितले. 

पण, त्यानंतर चक्रे हलली व केंद्रिय क्रीडा मंत्र्यांच्या एका सचिवाने पुण्याच्या एका  वरिष्ठ अधिकाऱ्याला या सरावाकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना दिल्या. 'संबंधित खेळाडू ही कॉमनल्वेल्थ खेळाडू असून ती ऑलिंपिकसाठी प्रयत्न करते आहे. तिला सरावासाठी परवानगी द्यावी. पोलिसांनी सराव बंद करु नये म्हणून आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंती   क्रीडा मंत्र्यांनी आपणाला करण्याच्या सूचना दिल्या आहेत,' असे रिज्जू यांच्या व्यक्तीगत सचिवाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. याबाबत खात्री करुन घेण्यासाठी पुण्याचे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.  या प्रकाराकडे दुर्लक्ष करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा प्रकार पोलिस खात्यात आणि क्रीडा क्षेत्रातही चर्चिला जात आहे. 

एकट्या दुकट्या खेळाडूला परवानगी देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. सद्य परिस्थितीत कुणाला परवानगी मिळाली याबद्दल दुःख होण्याच कारण नाही. पण कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता सगळ्यांना सारखा नियम लागू करणे अपेक्षित आहे.  एका खेळाडूला परवानगी द्यायची असेल तर अन्य खेळाडूंनाही ती मिळाली पाहिजे, असा सूर उमटला तर त्यात नवल वाटू नये. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात येस बँक प्रकरणातील संशयित वाधवा बंधूंना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी गृह खात्याचे प्रधान सचीव अमिताभ गुप्ता (आयपीएस) यांना निलंबित करण्यात आले होते. मंत्री पातळीवर याची काहीच कल्पना नव्हती, असे त्यावेळी सांगितले गेले होते. मागे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'चहापेक्षा किटली गरम...' असे सांगत नोकरशहांच्या मानसिकतेचे वर्णन केले होते. पुण्यात एका खेळाडूला सरावाची परवानगी देतानाही हाच प्रकार घडला असावा की काय? असा प्रश्न या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com