
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्षाला किती कोटी खर्च येणार याचा मेळच अद्याप प्रशासनाने घातलेला नाही.
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा मेळच नाही
पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Medical College) वर्षाला किती कोटी खर्च (Expenses) येणार याचा मेळच अद्याप प्रशासनाने (Administrative) घातलेला नाही. प्रशासनाकडून अर्धवट माहिती पुरविल्याचे आजच्या (ता. ९) बैठकीत महाविद्यालयाचे शुल्क (College Fee) निश्चीत झाले नाही.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देताना त्यासाठी १०० प्रवेशासाठी परवानगी दिल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची शुल्क निश्चीती करणे, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक परवानगी घेणे, विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविणे या कामांना गती येणार आहे.
हेही वाचा: शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा; राज ठाकरेंचं आवाहन
महापालिकेत आज महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे अध्यक्ष तथा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुल्क निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये महाविद्यालयाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच शुल्क किती असावे? शासकीय महाविद्यालयांप्रमाणे असावे का, खासगी महाविद्यालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये यांच्या शुल्कांमधील सुवर्णमध्य असावा अशी चर्चा झाली. मात्र, यावेळी प्रशासनाकडे माहिती मागितली असता बरीच माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले. वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यानंतर पगार, पुस्तके, वसतीगृह, वीज बिल, देखभाल दुरुस्ती, रुग्णालयासाठी आवश्यक साधणे, प्रयोगशाळा साहित्य यावर दरवर्षी किती खर्च येऊ शकतो याचे नियोजनही या बैठकीत प्रशासनाकडून मिळाले नाही. प्रशासनाच्या अर्धवट तयारीमुळे या बैठकीत शुल्क किती असावे हे निश्चित झाले नाही.
‘वैद्यकीय महाविद्यालये शुल्क निश्चित करण्यासाठी आज बैठक झाली. शुल्क किती असावे, कर्मचारी भरती, महाविद्यालय सुरू करतानाची तयारी यावर चर्चा खूप झाली, पण प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळाली नाही. वर्षाचा एकूण खर्च किती याची इत्थंभूत माहिती तयार केली जात आहे. त्यामुळे यावर पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. ११) बैठक होणार आहे.’
- मुरलीधर मोहोळ, महापौर.
Web Title: Expenses Of Pune Municipal Corporations Medical College Do Not Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..