esakal | ‘जम्बो’मध्ये ऑक्सिजन बचतीचा प्रयोग

बोलून बातमी शोधा

Oxygen

‘जम्बो’मध्ये ऑक्सिजन बचतीचा प्रयोग

sakal_logo
By
- ज्ञानेश सावंत

पुणे - ऑक्सिजनच्या टंचाईवरून ‘अलर्ट’ झालेल्या अधिकारी, डॉक्टरांनी शक्कल लढविली अन काही तासांत तर तेरा टन ऑक्सिजन वाचले. रुग्णांची ऑक्सिजनची पातळी वाढताच त्यांच्याकडील ऑक्सिजनचा मास्क काढला; तेव्हा काही मिनिटे पुरवठ्याचा वेगही कमी केला अन ऑक्सिजनची पातळी कमी होताच, मास्क लावला... रुग्णांची प्रकृती सुधारताना काही मिनिटे ऑक्सिजनचा पुरवठा कमी केल्याने ही बचत झाली. शिवाजीनगरमधील जम्बोत बुधवारी रात्री हा प्रयोग केला गेला; तो यशस्वी झाला आणि सकाळी टँकरमध्ये २० पैकी १३ टनांहून अधिक साठा शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

जम्बोत ६५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे रोज १८ ते २० टन ऑक्सिजनची गरज लागते. सध्या पुरवठा सुरळीत असला तरी, तो कधीही कमी पडण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यावर ‘जम्बो’च्या प्रमुख रुबल अग्रवाल, समन्वयक राजेंद्र मुठे, ‘जम्बो’चे सीइओ अंबर आयदे, डाॅ. श्रेयांश कपाले यांनी, ज्यांची प्रकृती सुधारत आहे, अशा रुग्णांचा ऑक्सिजन मास्क काढून, पुरवठा बंद करण्याची कल्पना मांडली.

ऑक्सिजन कमी पडणार नाही; त्याचा वापरही जपून करण्याबाबत उपाय सुरू आहेत. त्यातून सर्वाधिक रुग्ण असलेल्या जम्बोत रुग्णांची गरज ओळखून ऑक्सिजन मास्क लावले जातील, मात्र त्यासाठी सुरक्षिततेला प्राधान्य आहे.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘जम्बो’त बुधवारी रात्री केवळ सात टनाचा वापर झाला. रुग्णांच्या प्रकृतीवर २४ तास लक्ष ठेवून गरजेनुसारच ऑक्सिजन दिले त्यासाठी जादा वैद्यकीय कर्मचारी नेमले होते.

- राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो हॉस्पिटल

हेही वाचा: पुणे शहर पोलिस दलाची कोरोना तपासणी; उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था

‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे नियंत्रण

रुग्णांचा मास्क काढून, ऑक्सिजन पुरवठ्याचा वेग कमी करण्याची रिस्क घेताना प्रत्येक तीन रुग्णांच्या बेडजवळ एक डॉक्टर, कर्मचाऱ्यांची रात्रभरासाठी नेमणूक केली. प्रत्येक अर्ध्या तासानी ऑक्सिजन पातळी मोजून म्हणजे, ज्या रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९४-९५ पर्यंत आहे, त्यांचे मास्क काढण्यात आले. किमान १० ते १२ मिनिटे ते बाजूला ठेवले. जेव्हा-केव्हा ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी झाला; तेव्हा लगेचच मास्क लावून पुरवठा सुरळीत करण्यात आला. रुग्णांची काळजी घेतली जाते का, किती वेळ मास्क काढला, त्या वेळेतील ऑक्सिजन पातळी, यावर रात्रभर तेही प्रत्यक्ष आणि काही वेळा ‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे नियंत्रण ठेवले गेले. परिणामी, जम्बोतील ऑक्सिजन बचतीचा हा प्रयोग गरजेनुसार केला जाणार असल्याचे अंबर आयदे यांनी सांगितले.

जम्बोतील रुग्ण (ऑक्सिजन)

  • ६५० रोजची गरज

  • १८ ते २० टन प्रत्यक्ष उपलब्ध रोज

  • १८ टन बुधवारी झालेली बचत