

मोरगाव, ता. ३ : मोरगाव-आंबी रस्त्यावर सुमारे पावणेतीन लाखांची मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्यामुळे सुपा पोलिसांनी मूळ मोरगावच्या व सध्या पुण्यात राहणाऱ्या शशांक वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
मोरगाव येथे बुधवारी (ता. २) घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोरगाव-आंबी रस्त्याच्या कडेला ‘अलसोल’ कंपनीचे लिक्विड सिरपचे साठ बॉक्स (सुमारे ३००० बाटल्या) आणि ‘पिल्सोल’ कंपनीच्या अंदाजे सहा हजार कॅप्सूल गोळ्यांची पाकिटे अज्ञात व्यक्तीने आणून टाकली होती. हा प्रकार लक्षात येताच पोलिस हवालदार अनिल दणाणे यांनी फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच एका वाड्यात पूर्वी हा औषधसाठा ठेवण्यात आला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता, उघड्यावर फेकण्यात आलेली औषधे आणि वाड्यात शिल्लक असलेले औषधांचे नमुने एकच असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली असता, हा साठा शशांक सदाशिव वाघ (मूळ रा. मोरगाव, सध्या कोथरूड, पुणे) याचा असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे गावातील अनेक ग्रामस्थांनी उघड्यावर पडलेली औषधे घरी नेल्याचीही माहिती काही जणांनी दिली. सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पवार, राहुल भाग्यवंत, तुषार जैनक, किसन ताडगे आणि दणाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
मोरगाव येथे उघड्यावर औषध टाकण्याचा प्रकार चुकीचा आहे. शासकीय दवाखान्यात ऑनलाइन पोर्टलद्वारे औषधसाठा अद्ययावत असतो. खासगी वैद्यकीय दवाखान्यातील अशी मुदतबाह्य औषधे बायोमेडिकल वेस्टद्वारे देणे बंधनकारक आहे. चुकीच्या पद्धतीने उघड्यावर टाकल्यास बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
- डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, बारामती तालुका
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. २) सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व पाहणी करण्यात आली व येथील वस्तुस्थितीचा पंचनामा करून वरिष्ठ औषध व अन्न प्रशासनाला पोलिसांमार्फत कळविण्यात आले; परंतु औषध विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत. उघड्यावर असणाऱ्या औषध साठा याच ठिकाणी खड्डा खोदून नष्ट करण्यात आला.
- शशिकांत शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सुपा
दृष्टिक्षेपात
उघड्यावर फेकलेली औषधे लहान मुले, जनावरे आणि नागरिकांच्या संपर्कात आल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता.
औषधांमधील रसायनांमुळे माती आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान.
भारतीय न्याय कायदा कलम २७२, २९२ आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार गुन्हा दाखल.
नष्ट न करता फेकलेल्या औषधांची एकूण किंमत सुमारे दोन लाख ७६ हजार रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.