esakal | "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

adar poonawala main.jpg
"कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीची खुल्या बाजारातील किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त असल्याची चर्चा माध्यमांद्वारे होत आहे. यावर लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी ही लस माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली असून, फक्त मोजक्या खासगी वितरणासाठी ती ६०० रूपयांना विकली जाणार आहे, असं सीरमनं म्हटलं आहे.

निवेदनाद्वारे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला म्हणतात, ‘‘जगभरातील लशीच्या किमतीशी भारतातील किमतीशी तुलना करणे अयोग्य असून, 'कोविशिल्ड'ची लस सध्या बाजारात उपलब्ध लशींपैकी परवडणारी लस आहे. ज्या देशांनी उत्पादनासाठी निधी पुरविला होत अशा देशांमध्ये लशीची सुरवातीची किंमत अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे. भारतासह जगभरातील सरकारी लसीकरण मोहिमेसाठी ही लस अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’

हेही वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; आयात होणाऱ्या लस, ऑक्सिजनवरील कर माफ

जगभरात कोरोना विषाणूचे नवीन स्ट्रेन येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनिश्चिततेचे वातावरण आहे. साथीच्या काळात लोकांचे प्राण वाचावे म्हणून आम्ही लशीचे उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहोत. कोव्हिशिल्डच्या एकूण उत्पादनापैकी अगदी थोडा साठ खासगी खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच, बाजारात सध्या उपलब्ध कोरोना उपचार पद्धती आणि औषधांच्या तुलनेत ही लस स्वस्त असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. देशासह जगभरातील लसीकरणासाठी आम्ही उत्पादक कंपनी म्हणून कटिबद्ध असल्याचंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.