Pune : जमिनीचा ताबा देण्यासाठी तीस लाख रुपये खंडणीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Pune : जमिनीचा ताबा देण्यासाठी तीस लाख रुपये खंडणीची मागणी

किरकटवाडी: पन्नास लाख रुपये देऊन खरेदी केलेल्या जागेचा ताबा देण्यासाठी तीस लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या व बेकायदेशीरपणे मुळ मालकाचे नाव काढून फलकावर स्वतःचे नाव टाकून अतिक्रमण करणाऱ्या दोघांविरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास सोपान नानगुडे व सोमनाथ कंक (रा. गोऱ्हे बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे असून याप्रकरणी अक्षता अनंत भरेकर (वय 56, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

अक्षता भरेकर यांचे पती सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशांतून त्यांनी गोऱ्हे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय फाळके यांच्या मालकीची दहा गुंठे जागा पन्नास लाख रुपये देऊन खरेदी केलेली आहे. सदर जागेवर ज्ञानेश्वर फाळके यांच्या नावाचा फलकही लावलेला होता. कायदेशीर व्यवहार केलेला असताना कैलास नानगुडे व सोमनाथ कंक यांनी भरेकर यांना जमीनीचा ताबा घेण्यास विरोध केला व वेळोवेळी तीस लाख रुपयांची मागणी केली.

काल दि. 29 सप्टेंबर रोजी भरेकर हे आपल्या खरेदी केलेल्या जागेवर गेले असता जुन्या फलकावरील ज्ञानेश्वर फाळके यांचे नाव काढून त्या जागी कैलास नानगुडे व सोमनाथ कंक यांचे नाव टाकलेले दिसले. तसेच जेसीबी मशिनने खोदाई केलेली दिसली. त्यामुळे अनधिकृतपणे जागेत घुसून नुकसान केल्याप्रकरणी व तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नानगुडे व कंक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.