अतिरिक्त शिक्षकांना रात्रशाळेत काम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

वैद्यकीय खर्च मिळणार
रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना दिवस शाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देय राहणार आहे. तसेच, प्रचलित धोरणानुसार रात्रशाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वाने भरती धोरण लागू असेल. रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविताना आवश्‍यक असणारी प्रयोगशाळा जवळच्या दिवस शाळेतील वापरता येणार आहे.

पुणे : नियमित शाळेत दिवसा अध्यापन करून रात्रशाळेत अर्धवेळ शिकविणाऱ्या शिक्षकांचे काम आता अतिरिक्त ठरलेल्या आणि कोणत्याही शाळेत समावेश झाला नाही, अशा शिक्षकांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. रात्रशाळेची बायोमेट्रिक हजेरीही सक्तीची केली आहे.

रात्रशाळेसाठीच काम करणारे आणि दिवसा नियमित काम करून रात्रशाळेत शिकविणारे असे दोन प्रकारचे शिक्षक रात्रशाळेत काम करतात. दिवसा काम करणाऱ्या शिक्षकांना रात्रीच्या अध्यापनाचे वेगळे वेतन द्यावे लागते. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी आता अतिरिक्त शिक्षकांचे नियमित समायोजन होईपर्यंत रात्रशाळेत काम देण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंबंधीचा नवा आदेश जारी केला आहे.

दुबार नोकरी नाही
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रात्रशाळेत काम उपलब्ध करून दिल्याने शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे. महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी विनियमन अधिनियमानुसार दिवसा पूर्णवेळ खासगी अनुदानित वा विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुबार नोकरी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे नियमित शाळेत समायोजन होईपर्यंतच रात्रशाळेत रिक्त पदांवर त्यांना काम दिले जाणार आहे. रात्रशाळा बंद पडल्यास एकाच ठिकाणी काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन अन्य रात्रशाळेत केले जाणार आहे. रात्रशाळेतील ज्या विषयाचा कार्यभार पुरेसा नसेल अशा विषयांसाठी मानधन वा तासिका तत्त्वावर किंवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करता येणार आहे.

रात्रशाळा शिक्षक अविनाश ताकवले म्हणाले, ""राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरूपी संरक्षण मिळाले आहे. या शिक्षकांना वैद्यकीय खर्चाचा परतावाही मिळणार आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra teachers to work in night school