हॅकर्सचा डोळा सर्व सामान्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

हॅकिंगद्वारे संस्था, कार्यालये, कंपन्यांना धमकाविण्यापासून ते खंडणी उकळण्यापर्यंतच्या अनेक घटना घडत आहे.

हॅकर्सचा डोळा सर्व सामान्यांवर

पुणे - हॅकिंगद्वारे (Hacking) संस्था, कार्यालये, कंपन्यांना धमकाविण्यापासून ते खंडणी (Ransom) उकळण्यापर्यंतच्या अनेक घटना घडत आहे. याच पद्धतीने सायबर गुन्हेगार, (Cyber Crime) हॅकर्स (Hackers) आता सर्वसामान्यांकडेही वळू लागले असून मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट यंत्रणा हॅक करण्याच्या घटना घडत आहेत. मागील १५ महिन्यांत शहरात हॅकिंगच्या पावणे दोनशे घटनांमध्ये ‘कॉमन मॅन’च हॅकर्सची शिकार ठरत आहे.

सायबर गुन्हेगार, हॅकर्सकडून मोठमोठ्या कंपन्या, संस्था, कार्यालयांना वारंवार लक्ष्य केले जात होते. विशेषतः मागील काही वर्षांपासून हॅकिंगच्या घटना सतत घडत आहेत. हॅकर्सची जाणीवपूर्वक त्रास देण्यापासून ते खंडणी उकळण्यापर्यंत मजल गेली आहे. २०२१ मध्ये शहरात हॅकिंगच्या ९२ घटना होत्या, तर यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच हॅकिंगच्या ८२ घटना घडल्याची नोंद पुणे सायबर पोलिसांकडे झाल्याची सद्यःस्थिती आहे.

नेमके कशासाठी?

सायबर गुन्हेगार, हॅकर्स वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईलपासून ते कंपन्या, बॅंका, सरकारी कार्यालये यांच्या स्वीच सर्व्हर, संगणकीय यंत्रणा, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइटस्‌ हॅक करीत आहेत. पैशांची चोरी, फसवणूक, गोपनीय डेटा चोरणे, स्पर्धक कंपनीचा महत्त्वाचा डेटा, वेबसाइट, सर्व्हर हॅक करून खंडणी उकळण्यापासून ते हॅकिंगच्या माध्यमातून शत्रुराष्ट्रांना संरक्षण विभागातील अतिसंवेदनशील माहिती पुरविण्यापर्यंतचे गंभीर गुन्हे केले जातात.

सायबर गुन्ह्यात वाढ

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने २०२१ मध्ये ‘भारतातील गुन्हे २०२०’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात देशात सायबर गुन्ह्यांची ५० हजार ३५ प्रकरणे नोंदविली आहेत. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये सायबर गुन्हे ११.८ टक्‍क्‍यांनी वाढल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण २०१९ मध्ये ३.३ वरून २०२० मध्ये ३.७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. कोरोनाच्या कालावधीत इंटरनेट वापर वाढल्याने बॅंकिंग फसवणूक, ओटीपी/एटीएम फसवणूक, बनावट बातम्या आणि ऑनलाइन हॅकिंगच्या घटना वाढल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मोबाईलप्रमाणेच बॅंका, मोठ्या कंपन्यांचा डेटा हॅक होण्याचे अनेक प्रकार घडतात. नागरिक व कंपन्यांनी सिक्‍युरीटी सिस्टीम मजबूत करावी.

- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हॅकर्सचा वाढता धोका लक्षात घेऊन कंपन्या, संस्था व कार्यालयांनी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारनेही हॅकिंगबाबत प्रशिक्षण, कार्यशाळा घेऊन जनजागृती वाढविली तरच या घटना टळतील.

- श्रेयस गुजर, इथकिल हॅकर/सिक्‍युरीटी रिसर्चर

२०२२ मधील हॅकिंगच्या तक्रारींची वर्गवारी व संख्या...

 • ०७ - डेटा इन्स्क्रिप्शन, खंडणी, रॅन्समवेअर

 • ४० - हॅकिंग ई-मेल, फिशिंग

 • १० - ई-मेलवर पैसे वर्ग करणे

 • ०३ - वेबसाइट हॅकिंग

 • २२ - व्हॉटस्‌ॲप हॅकिंग व खंडणी

अशी घ्या काळजी

 • संस्था, कंपन्यांनी आपले सॉफ्टवेअर, इंटरनेट यंत्रणेचे सतत सिक्‍युरिटी ऑडिट करणे

 • पासवर्ड सतत बदलणे/मजबूत करणे/डेटाचा कायम बॅकअप ठेवणे

 • सॉफ्टवेअर सिक्‍युरिटी सिस्टीम अधिक सक्षम करणे

 • आपल्या उपकरणांचे फर्मवेअर तत्काळ अद्ययावत करणे

 • वापरात नसलेल्या सेवा बंद करून ‘नॉन क्रिटिकल नेटवर्क एक्‍सप्लोरर’ कमी करणे

 • आपल्या डिव्हाइसमध्ये काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ फॅक्‍टरी रिसेट करणे

Web Title: Eye Of Hackers On All Commons Cyber Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneCyber CrimeHackers
go to top