पुणे शहरातील कॉंग्रेस आणि फिजिकल डिस्टसिंग याचीच शहरात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

-कॉंग्रेसच्या पदाधिकारी-नगरसेवकांचे 
आपल्याच नेत्यापासून "फिजिकल डिस्टसिंग' 
-त्यामुळे नेत्यावर निवेदन देण्याची वेळ 

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सपाटून मार खाल्यानंतरही पुणे शहर कॉंग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते मात्र काही सुधारायला तयार नाहीत. गटबाजीमुळे सोयीनुसार एकमेकांपासून "फिजिकल डिस्टसिंग' पाळण्याची जुनीच सवय असल्यामुळे त्याचा फटका सोमवारी एका नेत्याला बसला.

- पुणेकर खवय्यांसाठी 'थोडी खुशी थोडा गम'; वाचा महत्त्वाची बातमी

कोरोना संदर्भात महापालिका आयुक्तांसोबत बोलाविलेल्या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्या नेत्यावर निवेदन देण्याची वेळ आल्यामुळे पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी शहरातील कॉंग्रेसच्या एका नेत्याने आज सकाळी साडेदहाची वेळ घेतली होती. त्यासाठी पक्षाचे काही पदाधिकारी आणि नगरसेवकांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. परंतु केंद्रीय पथक येणार असल्यामुळे आयुक्तांनी वेळेत बदल करण्याची विनंती केली. त्याऐवजी साडेबाराच्या सुमारास ही बैठक घेऊ असा निरोपही दिला. परंतु दोन्ही वेळेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची दांडी मारली. अखेर साडेबाराच्या सुमारास आपल्या काही मोजक्‍या समर्थकांसह आयुक्तांना निवेदन देऊन परत जाण्याची वेळ त्या नेत्यावर आली. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉंग्रेस पक्षाला गटबाजी नवीन नाही. येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या जागा निघणार आहे. त्यामध्ये आपली वर्षी लागावी, यासाठी शहरातील काही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातून ही गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. या गटबाजीमुळेच पक्षातील नेते एकमेकांपासून सध्या फिजिकल डिस्टसिंग पाळून वाढत आहे. त्यातून क्रेडिट घेण्यासाठी या नेत्याने बोलाविलेल्या बैठकीपासून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक "डिस्टसिंग' पाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता.

एकीकडे कॉंग्रेसमधील हेवेदावे समोर आले असताना दुसरीकडे विधान परिषदेच्या जागांवरून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. मूळची पुणे शहरातील असलेल्या, परंतु राज्य स्तरावर काम करणाऱ्या एका महिला पदाधिकाऱ्यांचे नाव पक्षाकडून परिषदेसाठी निश्‍चित झाल्याची चर्चा सध्या जोरात आहे.

Video : कोरोना योद्धा म्हणायचं अन् पगार कपात करायचा?; पुण्यात नर्सेसचे आंदोलन

या महिला पदाधिकाऱ्याला संधी मिळू नये, यासाठी सर्व गटतट विरून काही मंडळी एकत्र आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात पक्षाचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली. कोणालाही संधी द्या. पण त्यांना नको असा सूर त्यांनी या भेटीत आवळला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यावर नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Factionalism in the Congress party in Pune city