Video : चंद्रकांत पाटलांच्या रॅलीत कोथरूडकर नव्हे तर.....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

आपण कोणाचा प्रचार करतोय हे ही या कार्यकर्त्यांना माहीत नव्हते. एका कार्यकर्त्यास कोणाचा प्रचार करताय असे विचारले असता त्याने शंकरभाऊंचा प्रचार करतोय असे उत्तर दिले...

पुणे : पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक चर्चा, वाद आणि विरोधानंतर चंद्रकांत पाटलांना ही उमेदवारी मिळाली. पण त्यांच्या पदयात्रेत भाडोत्री कार्यकर्ते आणले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पाटलांच्या शक्तीप्रदर्शनात दिसणारे कार्यकर्ते हे भाडोत्री आहेत की कोथरूडकर हा प्रश्नच आहे. 

Vidhan Sabha 2019 : अखेर चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला

आपण कोणाचा प्रचार करतोय हे ही या कार्यकर्त्यांना माहीत नव्हते. एका कार्यकर्त्यास कोणाचा प्रचार करताय असे विचारले असता त्याने शंकरभाऊंचा प्रचार करतोय असे उत्तर दिले. एकजण म्हणाला शिवसेनेचा प्रचार करतोय. यांना माहितीच नव्हते की आपण कोणाचा प्रचार करतोय. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्ते आणण्याची वेळ भाजपवर आल्याचे समजते. तसेच प्रचार संपल्यावर या कार्यकर्त्यांना सफरचंद वाटण्यात आले. 

काल (ता. 2) चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मोतीबागेतून प्रचाराला सुरवात केली होती. कालच्या प्रचार मेळाव्यातही त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. कोल्हापूरचे असलेलेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या उमेदवारीसाठी प्रचंड विरोध झाला. स्थानिकांना डावलून ही उमेदवारी दिल्याने भाजप तसेच शिवसेनेतही नाराजी बघायला मिळाली. तसेच बंडाच्या चर्चाही ऐकायला मिळत होत्या.

या सर्वांतून मार्ग काढत भाजपकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित झाली आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. कोथरूडमधील शिवसेनेचे इच्छूक चंद्रकांत मोटे, मुरलीधर मोहोळ यांनीही पाटलांना पाठिंबा दिला. अर्ज भरण्यासाठी आ. मेधा कुलकर्णी, खा. गिरीश बापट, खा. संजय काकडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake party workers in Chandrakant patil rally at Pune