‘आयटी’त खोटा अनुभव देणाऱ्यांनो सावधान! कंपन्यांकडून होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IT Company

आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी म्हणून काही उमेदवार खोटे अनुभवपत्र ( एक्सपिरीअन्स लेटर ) देत असल्याचे जवळपास सर्वांनाच माहीत आहे.

‘आयटी’त खोटा अनुभव देणाऱ्यांनो सावधान! कंपन्यांकडून होणार कारवाई

पुणे - आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी म्हणून काही उमेदवार खोटे अनुभवपत्र ( एक्सपिरीअन्स लेटर ) देत असल्याचे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. कोर्स बरोबरच असे एक्सपिरीअन्स लेटर देणाऱ्यांची बाजारात कमी नाही. त्यामुळे आता आयटी कंपन्याही जाग्या झाल्या असून, असा खोटा अनुभव सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरवात केली आहे. बंगळूरूतील एक्सेंचर कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले आहे.

‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातही सॉफ्टवेअरशी निगडित शॉर्ट टर्म कोर्स आणि खोटे अनुभवपत्र देणाऱ्या इन्स्टिट्यूटची कमी नाही. लवकर मिळणाऱ्या नोकरीमुळे विद्यार्थ्यांचाही अशा अभ्यासक्रमांना पर्यायाने गैरप्रकारांत सहभाग वाढला असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. आयटी मध्ये नोकरी मिळविण्यासाठी उत्सुक असलेला प्रफुल्ल तांबे (नाव बदललेले) सांगतो, ‘शहरात अनेक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. जिथे अभ्यासक्रमाबरोबर असे खोटे सर्टिफिकेटही तयार करून दिले जाते. साधारण ४० ते ७० हजार रुपये तीन ते चार महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी घेतले जातात. पण आता कंपन्यांच्या लक्षात येत असल्यामुळे अनेक उमेदवारांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे.’ आयटी कंपनीत नोकरी मिळवून देणारे जणू एक रॅकेटच तयार झाल्याचे पाहणीत लक्षात आले आहे.

प्रकरण काय?

सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध आहे. सॉफ्टवेअर कोडिंग आणि टेस्टींगसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज सध्या या उद्योगांना आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि नोकरीची हमी देण्यात येते. या नोकरीसाठी अशा इन्स्टिट्यूट सर्रासपणे खोटे अनुभवाचे पत्र जोडत असल्याचे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अशा इन्स्टिट्यूट आणि अभ्यासक्रमांकडे दिवसेंदिवस ओढा वाढत चालला आहे.

भारतातील आयटी नोकऱ्या -

आर्थिक वर्ष - कामगारांची संख्या (लाखांमध्ये)

२०१८ - ३९.७

२०१९ - ४१.०

२०२० - ४३.६

२०२१ - ४५.०

२०२२ - ४८.५

(स्रोत - Statista 2022)

पुण्यात अशा अनेक खासगी संस्था खोटे एक्सपिरीअन्स प्रमाणपत्र देत आहे. आता कंपन्यांच्याही लक्षात आले असून, मागच्या नोकरीच्या पुरव्यासाठी बॅंकेचे स्टेटमेंट मागत आहे.

- प्रमोद जाधव (नाव बदललेले)

माझ्या खोलीतील मित्राची सुद्धा हीच कथा आहे. टेस्टिंगचे क्लास करून सहा महिन्याच्या वर झाले. पण त्याला नोकरीचा कॉलच येत नाहीये. काही कंपन्यानीमुलाखतीला बोलविले पण अनुभवपत्र खोटे आहे, असे लक्षात येताच दुसऱ्याच दिवशी तो रिजेक्ट झाला.

- सुशिल काळे (नाव बदललेले)

मी अडीच वर्षे एका आयटी कंपनीत होतो. तेव्हा नवीन कामगार घेताना कागदपत्रे बारकाईने तपासले केले जातात. जस तुम्ही परिचय पत्रातील गुण आणि गुणपत्रकातील गुण सारखे नसेल, तर तिथेच तुम्हाला काढून टाकले जाते.

- आयटीतील नोकरदार