Video : 'धुराने मरण्यापेक्षा आत्मदहन करुन मरतो'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

 टायर, ट्यूब, बाटल्या, चप्पल जाळण्यासाठी वापरत असल्यामुळे भट्टीतून येणा-या धुरामुळे मुलगा, नात, शेळ्या मेल्या. त्याची तक्रार करुनही दखल घेत नसल्याने वैतागलेले निरवांगीचे शिंदे कुटूंब पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी आले.

कोथरुड (पुणे) : टायर, ट्यूब, बाटल्या, चप्पल जाळण्यासाठी वापरत असल्यामुळे भट्टीतून येणा-या धुरामुळे मुलगा, नात, शेळ्या मेल्या. त्याची तक्रार करुनही दखल घेत नसल्याने वैतागलेले निरवांगीचे शिंदे कुटूंब पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी आले. पोलिसांनी हुशारीने त्यांना रोखले खरे पण त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार का हा प्रश्न आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निरवांगी मधील शंकर रामचंद्र शिंदे, पत्नी उज्वला, सुन ताई, नातवंडे यांना घेवून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्यासाठी आले. बंडगार्डन पोलिसांनी त्यांना त्यापासून परावृत्त करत जिल्हाधिका-यांची भेट घालून देतो असे आश्वासन दिले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे जिल्हाधिकारी व्यस्त आहेत. तुम्ही उद्या या असे पोलिसांनी त्यांना सांगितले. 27 तारखेला शिंदे कुटूंब पोलिस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकारी मोठ्या मिटींगमध्ये आहे. त्यामुळे भेटू शकणार नाही. पोलिसांनी त्यांची निवासी जिल्हाधिका-यांशी गाठ घालून दिली. शिंदे कुटूंबाने निवासी जिल्हाधिका-यांना निवेदन देत पुन्हा जिल्हाधिका-यांना भेटण्याचा आग्रह धरला. दोन दिवसांनी पुन्हा या असे त्यांना सांगण्यात आले. गुरुवारी हे कुटूंब निरवांगी वरुन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आले. पण यावेळीही त्यांना जिल्हाधिकारी भेटले नाही. निवासी जिल्हाधिका-यांनी बारामतीच्या प्रांतांना भेटण्यास सांगितले. त्यामुळे हे कुटूंब अधिकच हताश झाले. सरकारने न्याय द्यावा एवढीच त्यांची मागणी आहे.

उज्वला शिंदे म्हणाल्या की, आमच्या घराशेजारी असलेल्या कुंभाराच्या भट्टीत टायर, ट्यूब, चपला, बाटल्या जाळल्या जातात. त्याच्या धुरामुळे माझा तरुण मुलगा वारला. माझी एक नात वारली, शेळ्यावर माझी उपजीविका चालते. त्याही या धुरामुळे मरत आहेत. आम्ही जगायचे तरी कसे. ग्रामपंचायतीपासून तहसिलदारापर्यंत सगळीकडे तक्रार केली. आता जिल्हाधिका-यांकडे आलोय, तर सगळीकडे आम्ही फक्त टोलवाटोलवीच पाहतो आहे. आम्हाला जर जिल्हाअधिकारी  भेटत नसतील, आमचे प्रश्न ऐकून घेत नसतील तर आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय काय पर्याय आहे सांगा.

Maidan Poster : 'तानाजी'नंतर आता अजय 'मैदान' गाजवायला सज्ज!

शंकर शिंदे म्हणाले की, वैद्यकीय खात्याने पाहणी करुन, संबंधित भट्टी मालकाकडे कोणताही परवाना नाही. तसेच धुर, धुळ व उग्रवास यामुळे जवळच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत आहे असे निरक्षण नोंदवले आहे. तरीसुध्दा त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष आहे.

छगन कांबळे म्हणाले की, माझ्या लहान मुलाला श्वसनाचा त्रास सुरु झाला आहे. आम्ही घरातले पण सारखे आजारी पडत आहोत. दवाखाना किती दिवस करायचा. तहसिलदार कारवाई करत नाही म्हणून जिल्हाधिका-यांकडे आलो. पण त्यांना आम्हाला भेटायला पण वेळ नाही. सर्वसामान्याला न्याय मिळत नसेल तर तो दुस-याचा जीव घेवू शकत नाही. पण आत्महत्या तर करु शकतो ना.

काय आहे मागणी - भट्टीचे स्थलांतर वस्तीबाहेर करावे. टायर, ट्यूब, बाटल्या, चप्पल जाळू नये. आरोग्यास हानी कारक असलेली वस्तीमधील भट्टी बंद करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family from Nirvangi village come to Kothrud for immolation