शेतमजुराच्या मुलाची भरारी, सरकारी वसतिगृहात राहून मिळवले २१ लाखांचे पॅकेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran kelgandre

प्रयत्नाला प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर ध्येय हे निश्चितच साध्य होते. हा आदर्श समाजातील इतरांनाही प्रेरणा ठरू शकतो, अशीच प्रेरणादायी भरारी किरण केंळगंद्रे या विद्यार्थ्यांने घेतली आहे.

शेतमजुराच्या मुलाची भरारी! सरकारी वसतिगृहात राहून मिळवले २१ लाखांचे पॅकेज

पुणे - प्रयत्नाला प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर ध्येय हे निश्चितच साध्य होते. हा आदर्श समाजातील इतरांनाही प्रेरणा ठरू शकतो, अशीच प्रेरणादायी भरारी किरण केंळगंद्रे या विद्यार्थ्यांने घेतली आहे. पुण्यात सरकारी वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या आणि शेतमजुराचा मुलगा असलेल्या किरणला सॅमसंग कंपनीने २१ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर दिली आहे.

किरणचे आई वडील दोघेही शेतमजुरी करतात. औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील पानवी गावात किरणने त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सामाजिक न्याय विभागाच्या पुण्यातील एक हजार मुला-मुलींची क्षमता असलेल्या सरकारी वसतिगृहात नंबर लागला आणि येथूनच त्याच्या जीवनाचा खरा प्रवास सुरु झाला. किरण या वसतिगृहात राहून ‘व्हीआयआयटी’ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. टेक. (इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन) अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील अनुभव सांगताना किरण म्हणाला, ‘‘या यशात वसतिगृहाची त्याला खूप मदत झाली. वसतिगृहात आल्यावर मला थोडे दडपण होते. सीनियर आपली रॅगिंग घेणार, अशी भीती होती. पण तसे काहीच झाले नाही. किंबहुना सिनियर्सनी लहान भावाप्रमाणे सांभाळून घेतले. काही मदत लागली तर ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे. वसतिगृहातील शैक्षणिक सुविधांमुळे माझ्या प्रगतीला चालना मिळाली.’

‘माझ्या यशात आई अनिता आणि वडील उत्तम केळगंद्रे यांच्यासोबतच वसतिगृहाचे गृहपाल संतोष जैन यांचा सिंहाचा वाटा आहे. एखाद्या व्यक्तीत जिद्द, चिकाटी, इतरांना मदत करण्याची भावना, बहुआयामी व्यक्तिमत्त्व कसे असावे हे जैन सरांकडून शिकलो,’ अशी भावना त्याने बोलून दाखवली.

किरणला कंपनीत निवड करताना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक म्हणजे तू कधी ‘टीमवर्क’ केले आहेस काय? त्यावर त्याचे उत्तर होते, ते म्हणजे ‘‘मी राहत असलेल्या वसतिगृहातूनच मला एकत्रित राहायला आणि शिकायला मिळाले. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाची सुरवात ही वसतिगृहातूनच झाली.’’

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनीही किरणचे अभिनंदन केले. तसेच, किरणचे हे यश इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे सांगत आयुक्त नारनवरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या हस्ते किरणचा सन्मान करण्यात आला. या वेळी समाज कल्याण अधिकारी मल्लिनाथ हरसुरे, गृहपाल संतोष जैन आदी उपस्थित होते.

‘समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर दिला. परिणामी राज्यातील वसतिगृहातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत आहेत,’ असे सोळंकी यांनी नमूद केले.

Web Title: Farm Laborer Son Kiran Kelgandre Success 21 Lakh Package Motivation Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..