Walchandnagar : महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation
वालचंदनगर : महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

वालचंदनगर : महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

वालचंदनगर - शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज तोडून मनमानी करणाऱ्या महावितरणच्या विरोधात आज जंक्शन (ता. इंदापूर) जवळील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत महावितरणच्या कार्यालयासमोरुन न उठण्याचा निर्धार शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यापासुन महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा व शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज तोडण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी आहे .मात्र वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पाण्यास आलेली पिके सकू लागली आहेत. उसाला वेळेत पाणी न मिळाल्यामुळे उसाचे टनेज घटणार असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.तसेच रब्बीच्या हंगामातील पेरणी केलेल्या गहू मका व ज्वारीच्या पिकांना ही फटका असणार असून अनेक शेतकऱ्यांची पेरणी ही रखडली आहे. महावितरण ने तातडीने शेतीपंपाची वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी जंक्शन जवळील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

हेही वाचा: अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये हडपसरच्या दशरथ जाधव यांचा प्रवेश निश्चित

यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील बिग्रेड शेतकरी संघटनचे महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पुणे जिल्हाचे अध्यक्ष पांडुरंग रायते, इंदापूर तालुकाध्यक्ष गुलाब फलफले, करमाळा तालुकाध्यक्ष निलकंठ शिंदे, हरिदास पवार, केशव जाधव, माउली वणवे, किसन दळवी, चंद्रकांत थोरात, मंगेश घाडगे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पुणे जिल्हाचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी सांगितले की, महावितरण मनमानी करीत असून शेतकऱ्यांची कृषी पंपाची विज तोडत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाची वीज तोंडी आदेशाने की लेखी आदेशाने खंडीत केली आहे. तसेच, महावितरण कृषी पंपासाठी काय दराने वीजशुल्क आकारात आहे याचीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. २७ मे २००५ व ११ ऑक्टोबर २०१२ या शासनानिर्णयाप्रमाणे विद्युत कायदा कलम ६५ अन्वये राज्यसरकारकडून महावितरणला किती अनुदान मिळाले आहे याचीही माहिती देण्यात येत नाही.महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांपासुन माहिती लपवत असून वीजपुरवठा सुरळीत करुन जोपर्यंत माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्धार केला असल्याचे रायते यांनी सांगितले.

loading image
go to top