निर्वी येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baban Malvadkar
निर्वी येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

निर्वी येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

शिरूर - बबन बाबूराव माळवदकर (वय ५५, रा. गुनाट, ता. शिरूर) यांनी काल (ता. २०) रात्री निर्वी (ता. शिरूर) येथील आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पैशांच्या उसनवारीतून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून, सावकारकीतून ही घटना घडली किंवा कसे याचा पोलिस शोध घेत आहेत.

मृत माळवदकर यांचा मुलगा राहुल बबन माळवदकर (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी आज गोरख सरोदे (रा. गुनाट, ता. शिरूर) याच्यासह त्याच्या आई व पत्नीविरोधात (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) माळवदकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मृत माळवदकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, चिठ्ठीत त्यांनी गोरख सरोदे, त्याची आई व पत्नीने घरी येऊन दमदाटी केल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

राहुल माळवदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार : त्यांचे वडील मृत बबन माळवदकर यांनी गोरख सरोदे यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी सात लाख रूपये हातउसणे घेतले होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी सरोदे यांना सर्व रक्कम परत केली असतानाही ते व्याजाच्या पैशांवरून वडीलांना शिवीगाळ, दमदाटी करीत होते. काल (ता. २०) सकाळी ते त्यांच्या आई व पत्नीसह आमच्या घरी आले व वडीलांना पुन्हा व्याजाच्या पैशांवरून शिवीगाळ, दमदाटी करून, जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. त्या तणावात वडीलांनी रात्री निर्वी येथील शेतात जाऊन तेथे गळफास घेतला.

मृत माळवदकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर केवळ दमदाटी मुळे आत्महत्या केल्याचे नमूद असल्याने गोरख सरोदे याच्यासह त्याच्या आई व पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या माहितीनूसार व्याजाच्या पैशांवरून दमदाटी झाली असेल; तर त्याबाबत तपास करून बेकायदा सावकारकीचे कलम लावले जाईल, असे या प्रकरणाचा तपास करणार पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Farmer Commits Suicide Hanging At Nirvi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..