
.
मंचर,ता.२२ : चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील शेतकरी शिवाजीराव महादेव इंदोरे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ८६०३२ या जातीच्या उसाचे पीक घेतले आहे. कमी खर्चात अडसाली उसातून एकरी १०७ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या ऊसाला जवळपास ५० ते ५४ कांडे असून एका ऊसाचे वजन पाच ते किलो आहे. योग्य नियोजन केल्यास एकरी शंभर टन पेक्षा अधिक उत्पादन काढणे सहज शक्य असल्याचे इंदोरे यांनी दाखवून दिले आहे.
ऊस लागवड नियोजन
सुरूवातीला मातीचे परीक्षण करून घेतले. परीक्षण अहवालानुसार खतांची निवड केली. नांगरणी केल्यानंतर चार ट्रॉली शेण खताचा वापर केला. जमीन लागवडी योग्य झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने साडेतीन फूट अंतरावर सूर्यप्रकाशाचा कार्यक्षम वापर होण्यासाठी उसाच्या सऱ्या दक्षिणोत्तर काढल्या. नऊ ते ११ महिने वाढ झालेल्या रोग व कीडमुक्त ८६०३२ जातीच्या उसाची बेणे निवड केली. लागवडीपूर्वी बेसल डोस, बेणे प्रक्रिया केली. दोन डोळे समांतर ठेऊन डोळे वर राहतील अशा पद्धतीने व्यवस्थित ता.१५ जून २०२३ रोजी टिपऱ्यांमध्ये सहा इंच अंतर ठेऊन लागवड केली. ९० ते १०० मुळ्यांचा वापर केला.
सुरुवातीला लागवडीच्या वेळी दोन गोणी युरिया व तीन गोणी १० २६ २६ खताचा वापर केला. दीड महिन्यांनी खुरपणी केली. चार महिन्यानंतर सरी फोडताना दोन गोणी युरिया व तीन गोणी निंबोळी पावडरचा वापर केला. भीमाशंकर कारखान्याचे शेतकी अधिकारी मंदार गावडे, बाळासाहेब ढोंगे यांनी वेळोवेळी ऊस पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले.