11 दिवस, 630 किमी चालणं आणि शरद पवारांची भेट; अखेर विदर्भातील शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण

मिलिंद संगई, बारामती.
Wednesday, 16 December 2020

काहीही झाल तरी शरद पवारांना भेटायचच, हे मनाशी ठरवून ते जवळा गावातून थेट चालत बारामतीच्या दिशेने निघाले. माणसाची इच्छाशक्ती दांडगी असेल तर तो काहीही करु शकतो, असे म्हणतात. देशमुख हे तब्बल 11 दिवस जवळपास 630 कि.मी.चे अंतर चालून 11 डिसेंबरला बारामतीत पोहोचले. पवारांच्या मूळ गावी काटेवाडीत या बहाद्दर शेतकऱ्याला सन्मानित केले गेले.

बारामती : .....एखाद स्वप्न पूर्ण झाल्यावर माणसाच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू बाहेर पडतात, तिच गत काल संजय खंदार देशमुख यांची झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील अरणी तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावातील हे छोटे शेतकरी. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना समक्ष भेटून त्यांच्याशी बोलण्याची त्यांची इच्छा होती.  ''डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यानंतर बळीराजाचे प्रश्न समजून घेणारा दुसरा नेता म्हणजे शरद पवार ही देशमुख'' अशी त्यांची भावना. त्या भावनेपोटीच यंदा काहीही झाल तरी शरद पवारांना भेटायचच, हे मनाशी ठरवून ते जवळा गावातून थेट चालत बारामतीच्या दिशेने निघाले. 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

माणसाची इच्छाशक्ती दांडगी असेल तर तो काहीही करु शकतो, असे म्हणतात. देशमुख हे तब्बल 11 दिवस जवळपास 630 कि.मी.चे अंतर चालून 11 डिसेंबरला बारामतीत पोहोचले. पवारांच्या मूळ गावी काटेवाडीत या बहाद्दर शेतकऱ्याला सन्मानित केले गेले. त्यांची कथा ऐकून प्रवीणदादा गायकवाड व अमोल काटे यांनी शरद पवार यांच्याशी त्यांची भेट घडवून आणण्याचे ठरवले. स्वत: शरद पवारांना ही बाब समजल्यावर त्यांनी काल मुंबईऐवजी पुण्यामध्ये त्यांना घेऊन या असा निरोप दिला.

काल मोदीबागेतील पवारांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी संजय देशमुखांना तब्बल दीड तासांचा वेळ देत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पवारांना पाहून व त्यांच्या आदरातिथ्याने भारावून गेलेल्या देशमुखांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. या भेटीने आपले जीवनच सार्थक झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. माझ्या घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवारसाहेबांचा फोटो आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आयुष्यात एकदा तरी साहेबांचे दर्शन व्हावे व शक्य असल्यास त्यांच्याशी बोलता यावे इतकीच त्यांनी इच्छा होती. शरद पवार यांनीही या शेतक-याच्या इच्छेचे मान ठेवत त्यांना दीड तास वेळ देत विदर्भातील शेतीच्या परिस्थितीचीही माहिती घेतली. 

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Farmer Walked about 630 Km for 11 Days to meet Sharad Pawar