भामा आसखेडच्या जलवाहिनी, जॅकवेलचे काम पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रविवारी (ता. 25) भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी बंद पाडले. वारंवार आश्वासन देऊनही प्रशासन मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरण परिसरात जाऊन काम बंद केले. परिणामी, भामा आसखेडचे पाणी पिण्यासाठी पुणे शहराला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

आंबेठाण (पुणे) : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रविवारी (ता. 25) भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी बंद पाडले. वारंवार आश्वासन देऊनही प्रशासन मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरण परिसरात जाऊन काम बंद केले. परिणामी, भामा आसखेडचे पाणी पिण्यासाठी पुणे शहराला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

भामा आसखेड आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी करंजविहिरे (ता. खेड) येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आम्ही प्रलंबित मागण्यांसंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. त्यासाठी वारंवार पुणे येथे हेलपाटे मारीत आहोत. अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेतल्या आहेत तरीही प्रशासनाला काहीही फरक पडत नाही. त्यांच्याकडून चालढकल सुरू आहे, असा आरोप केला.

ज्या वेगाने काम सुरू आहे, त्याच वेगाने प्रश्न सोडविले पाहिजेत, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अधिकारी वर्ग एजंटांना सन्मानाची वागणूक देतात, त्यांना पायघड्या टाकतात; परंतु शेतकऱ्यांना मात्र ताटकळत ठेवून हेलपाटे मारावे लागत आहे, असाही आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. बैठकीनंतर सर्व आक्रमक शेतकरी जॅकवेलकडे निघाल्यानंतर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले; तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि काम बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार तेथे असणाऱ्या कामगारांनी काम बंद केले. तत्पूर्वी बैठकीप्रसंगी सत्यवान नवले, देविदास बांदल, माजी उपसरपंच किसन नवले, गजानन कुडेकर, गणेश जाधव, रोहिदास गडदे, बळवंत डांगले, स्वप्नील येवले, किसन नवले, नवनाथ शिवेंकर, ज्ञानेश्वर कलवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मागील वेळी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी मला हाताला धरून आणि विश्वासात न घेता मोटारीचे बटण दाबायला सांगितले. माझी त्याला कुठलीही संमती नव्हती. मी काम सुरू आहे की नाही, हे पाहायला आलो होतो; परंतु मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले म्हणून मी बटण दाबले. आमचे प्रश्न पहिले सुटले पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
- ज्ञानेश्वर कलवडे, शेतकरी, पराळे, ता. खेड

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Agitation Against Bhama Askhed Pipeline