
गूळ भेसळ रोखण्यासाठी शेतक-यांचा एल्गार
केडगाव - दौंड तालुक्यात एक हजारच्या वर गु-हाळे असून यातील बहुतांश गु-हाळ घरांमध्ये भेसळयुक्त गूळ बनविला जात आहे. हा गूळ आरोग्यास घातक असल्याने आता शेतक-यांनीच या भेसळविरोधात दंड थोपटले आहेत. यात प्रामुख्याने परप्रांतीय गु-हाळ चालकांचा समावेश आहे. याबाबत शेतक-यांनी अन्न व औषध प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसात कारवाई न झाल्यास घंटानादाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले की, दौंड तालुक्यात एक हजारच्यावर गु-हाळे चालू आहेत. बहुतांश गु-हाळे ही परप्रांतीय चालवत आहेत. ते गूळ तयार करण्यासाठी खराब साखर, कालबाह्य झालेली चॅाकलेट व रिजेक्ट झालेला गूळ याचा वापर करून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त गुळाची निर्मिती करीत आहेत. हा भेसळयुक्त गूळ आरोग्यास हानीकारक आहे. भेसळयुक्त गूळ करण्यासाठी लागणारी खराब साखर, बुरशी आलेली चॅाकलेट याचा पुरवठा दौंड तालुक्यातील व्यापारी अथवा एजंट यांच्याकडून होत आहे. असे एजंट व वाहन मालक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
रात्रीच्यावेळी २५ टन वजनाच्या मालट्रक गु-हाळांवर खाली होत असतात. आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास शासकीय कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद व उपोषण करण्यात येईल. निवेदनाच्या प्रति पोलिस अधीक्षक, तहसीलदार, यवत पोलिसांना देण्यात आल्या आहे. कधी नव्हे ते शेतकरी व गु-हाळ जागा मालकांनी भेसळ विरोधात दंड थोपटले आहेत. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने केडगाव येथे वर्षापुर्वी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात असे सांगितले होते की, गूळ हा पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनविला पाहिजे. त्यात चांगली साखर मिसळणे हा सुद्धा गुन्हा आहे. या चर्चासत्रात अधिका-यांनी अनेक इशारे दिले मात्र ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे भेसळीचे धाडस वाढले आहे. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. शेतक-यांच्या इशा-यानंतर तरी औषध प्रशासन जागे होणार का हा खरा प्रश्न आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय नारगुडे म्हणाले, ''यापुर्वीही आम्ही कारवाया केलेल्या आहेत. आताही कारवाया चालू आहेत. शेतक-यांचे निवेदन आले म्हणून कारवाई करणार असे नाही.''