

उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा,
अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात निर्धार
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ‘सी-२ अधिक ५० टक्के’ सूत्रावर आधारित उसाला प्रतिटन सहा हजार ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात करण्यात आला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यास अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, राज्य सचिव गिरीश फोंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षीरसागर यांनी सध्याचे सरकार उद्योगधार्जिणे असल्याचा आरोप करत, कॉर्पोरेट कंपन्यांच्या डेटा सेंटरसाठी शेतकऱ्यांचे पाणी वळविले जात असल्याचे सांगितले. ऊसदर ठरविताना शेतकऱ्यांशी चर्चा करावी, तसेच साखरेच्या उत्पादनाबरोबर मळी, बगॅस, वीज आणि इथेनॉलमधून होणाऱ्या मूल्यनिर्मितीतील ७५ टक्के वाटा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
गिरीश फोंडे यांनी १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. ऊस अद्याप अपरिपक्व असल्याने लवकर गाळप सुरू करायचे असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मेळाव्यात साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये किलो करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करून निधी दुष्काळग्रस्त भागांसाठी वापरावा, यासह विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या वेळी जमीन वाचविण्यासाठी लढणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ गावांतील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.