'त्या' दिवशी माणसं जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळाली अन्...

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 12 जुलै 2020

पानशेत धरण फुटीच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर

खडकवासला (पुणे) : पानशेत धरण फुटलं. त्या दिसी सकाळी सकाळी आम्ही पाहिलं की, नदी दोन्ही बाजूने मोठी झाली होती. पुराचे पाणी रस्त्यावर आल व्हतं. गावात गोंधुळ उडाला. माणसं म्हणाली गाव सोडा. जीव वाचवण्यासाठी सगळी डोंगराकडे सैरावैरा पळाली. अश्रू डोळ्यात तरळत मारुती शिंदे यांनी ही आठवण सांगितली. पानशेत धरण १२ जुलै १९६१ रोजी फुटले. त्यास आज रविवारी ५९ वर्षे पूर्ण झाले. त्यावेळी या धरणाचे बांधकाम सुरू होते. त्यानिमित्त या घटनेचे साक्षीदार असलेल्या पानशेत - सिंहगड भागातील काही प्रातिनिधिक वयोवृद्ध शेतकरी मावळ्यांचा शिवप्रतिमा, शिवचरित्र, शाल देऊन सन्मान करण्यात आला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील जागडे, मावळ जवान संघटनेचे कार्यवाहक रोहित नलावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इतिहास अभ्यासक दत्ता नलावडे, अनिल शिंदे यावेळी उपस्थित होते. या सन्मानाने शेतकरी हेलावून गेले अन ते 59 वर्षांपूर्वी घडलेल्या आठवणीनां उजाळा देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पानशेत धरण फुटीच्या महापुराचे साक्षीदार असलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे हे हवेली तालुक्यातील सोनापूर गावचे.
त्या दिवशी अगोदर कमी वेळेत जास्त अतिवृष्टी झाली. या थैमानाने १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले. या महापुराने पानशेत, सिंहगड खोऱ्यात पुणे शहर व परिसरात भयानक परिस्थिती होती.

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

या परिसरातील नागरिकांच्या काळजात कटू आठवण म्हणून पानशेत धरण फुटी कोरली आहे. या आठवणींचे साक्षीदार असलेल्या सिंहगड पानशेत, खोऱ्यातील मावळे व वयोवृद्ध शेतकरी हवेली तालुक्यातील मारूती शिंदे, रामभाऊ गणपती पवळे, वेल्हे तालुक्यातील ओसाडे येथील सखाराम लोहकरे आदीं वयोवृद्ध शेतकऱ्यांनी आठवणीनां उजाळा दिला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आंबी नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू होते. धरणाचा बांध फुटल्याने पुराचे पाणी पानशेत धरणाजवळ असलेल्या जानुबाईची टेकडीवरून मोसे नदीच्या पात्रात आला होता. त्यावेळी, मोसे नदीवर वरसगाव नव्हते. वरसगाव व परिसरातील शेतीवाडीचे मोठे नुकसान झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers felicitated for witnessing the eruption of Panshet Dam