जागते रहो! शेतकऱ्यांना करावी लागतेय कांद्याची राखण कारण...

  नवनाथ भेके
Thursday, 22 October 2020

कांदयाचा दर शंभर रुपये किलोच्या पुढे गेल्याने शेतकऱ्याला आता खऱ्या अर्थाने घामाचा दाम मिळेल अशी भावना आहे, परंतु सध्या वखारीत शिल्लक राहिलेल्या कांदयावर चोरटयांची वाकडी नजर गेली असुन वखारीतील कांदा चोरीला जाऊ लागला आहे

निरगुडसर(पुणे) : शेतकऱ्यांना आता कांद्याच्या वखारीजवळ खडा पहारा द्यावा लागणार असुन ''जागते रहो'' म्हणण्याची वेळ आली आहे, कारण बाजारभाव वाढल्याने आता कांदयाचीच चोरी होऊ लागली असून शेतकरी धास्तवला आहे. येथील जाधववाडी (ता.आंबेगाव) येथील प्रकाश शिवराम जाधव यांच्या चार पिशव्या चोरटयांनी लंपास केल्याची घटना मंगळवार (ता.२०)रोजी पहाटेच्या सुमारास घडली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

कांदयाचा दर शंभर रुपये किलोच्या पुढे गेल्याने शेतकऱ्याला आता खऱ्या अर्थाने घामाचा दाम मिळेल अशी भावना आहे, परंतु सध्या वखारीत शिल्लक राहिलेल्या कांदयावर चोरटयांची वाकडी नजर गेली असुन वखारीतील कांदा चोरीला जाऊ लागला आहे. जाधववाडी येथील शेतकरी प्रकाश जाधव यांची घरापासुन एक किमी अंतरावर असलेल्या सुंगरमळा येथे शेती असून तेथेच चारीनजीक कांदा साठवणुकीसाठी कुलुपबंद वखारी आहे. बाजारभाव वाढल्याने जाधव यांनी विक्रीसाठी पंधरा पिशव्या सोमवारी भरुन ठेवल्या होत्या परंतु मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरटयांनी त्यातील चार पिशव्या चोरुन नेल्याने त्यांचे अंदाजे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.चोरीच्या घटनेमुळे भरलेल्या ११ पिशव्या जाधव हे घरी घेऊन गेले असुन गुरुवार(२२)रोजी ते कांदा पिशव्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेणार आहे.उर्वरित अजुन शिल्लक २५ पिशव्या कांदा वखारीत मोकळा असुन तो घरी नेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी चोरीचा प्रकार उघडकीस आला, त्यावेळी वखारी नजीक दुचाकीच्या टायरच्या खुणा आढळुन आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्याने गुरुवारी(ता.२२)मंचर पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे. बुधवारी राञी शेजारील मांजरवाडी गावाजवळ असणाऱ्या गणेश नगर (देवाची जाळी) येथे दोन चोरांना कांदा चोरी करताना शेतकऱ्यांनी पकडले आहे त्यात एक चोर फरार झाला आहे त्यामुळे त्याच चोरटयांनी जाधववाडी येथे डल्ला मारला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कांदयाला खडा पहारा देण्याची वेळ...
शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्च करुन कांदयाचे पिक घेतले परंतु समाधानकारक बाजारभाव नसल्याने मोठया प्रमाणात कांदा वखारीत शेतकऱ्यांनी साठवला, वातावरणातील बदलामुळे वखारीत कांदा मोठया प्रमाणात सडुन नुकसान झाले आणि आता कांदयाला चांगला दर मिळत असताना चोरटयांकडुन कांदयावर डल्ला मारला जात असल्याने आता शेतकऱ्यांवर कांदा वखारीबाहेर खडा पहारा देण्याची वेळ आली आहे.
चोरीला गेलेल्या वाहनांच्या तपासाला मिळणार वेग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have to guard onions because are being stolen