वीज बंद मुळे शेतकऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farm Labour

विद्युत उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषनामुळे नागापूर, रांजणी, वळती, थोरांदळे, जाधववाडी या गावातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Electricity Close : वीज बंद मुळे शेतकऱ्यांना फटका

निरगुडसर - रांजणी (ता. आंबेगाव) येथील विद्युत उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषनामुळे नागापूर, रांजणी, वळती, थोरांदळे, जाधववाडी या गावातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामध्ये वीज बंदची कुठलीही पूर्व कल्पना न देता वीजसेवा बंद केल्याने कांदा लागवड ठप्प झाली. यामुळे कांदा लागवडीसाठी या पाच गावात आलेले शेकडो मजूर विजेअभावी दिवसभर बसून राहिले याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी येथील विद्युत उपकेंद्रातील कर्मचारी बेमुदत उपोषणास बसले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रांजणी उपकेंद्रातून नागापूर, रांजणी, वळती, थोरांदळे, जाधववाडी या गावातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा होतो. परंतु, आज गुरुवार सकाळी कांदा लागवड सुरू आहे. त्यामुळे शेतावर मजूर दाखल झाले आणि वीज गायब झाली. शेतकऱ्यांनी ८०० रुपये जोडीने मजूर कांदा लागवडीसाठी शेतावर आणले. परंतु वीज गायब झाल्याने मजूर शेतावर बसून राहिले कांदा रोपे ही उपटून ठेवली होती. अशा अचानक वीज बंद च्या कारणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

नागापूर गावात जवळपास २०० एकर वरील कांदा लागवड ठप्प झाली होती. या गावासह रांजणी, वळती, थोरांदळे, जाधववाडी या गावातीलही हीच परिस्थिती होती. यामुळे ८०० रुपये जोडी मजुरीने आलेले शेकडो मजूर शेतात बसून राहिले याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नागापूर येथील शेतकरी कैलास पवार, रामचंद्र म्हस्के, सचिन इचके यांच्या शेतावरील ६० मजूर सह अन्य १५० मजूर शेतावर बसून राहिले. नागापूर येथील शेतकरी रामचंद्र म्हस्के म्हणाले की आज मी कांदा लागवडीसाठी १६ मजुर आणले होते. त्यासाठी ८०० रुपये जोडी प्रमाणे पैसे दिले असून सकाळी कांदा लागवडीला सुरुवात करण्यासाठी रोपे उपटून ठेवली आणि वीज गायब झाल्याने मोठा फटका बसला आहे.

नागापूर गावचे उपसरपंच सुनील शिंदे म्हणाले की, वीज पुरवठा बंद असल्याने गावाला कुठेच पाणीपुरवठा करता आला नाही नागरिकांना प्यायला पाणी नव्हते ही परिस्थिती वीज बंद मुळे उद्भवली आहे. याची कुठलीही पूर्व कल्पना दिली नाही यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

वीज बंद कशामुळे केला याबाबत कर्मचाऱ्यांना सेफ्टी टूल किट नाही, अर्थिंगसाठी पाण्याची व्यवस्था नाही, सिंगल फेज, थ्री फेज करताना पूर्ण रोटर स्विच, जम्प वारंवार तुटतात, काही ठिकाणी इंसुलेटर फुटलेले आहेत. त्या ठिकाणी डायरेक्ट तारा टाकून लाईन चालू केलेली आहे. ओपन क्लोजचे आयसोलेटर डायरेक्ट केलेले आहेत. ११ KV फिडर लाईनवरील जुने एबी स्विच दुरुस्त करणे व नवीन एबी स्विच बसविणे अशा अनेक धोकादायक परिस्थितीत या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागते. कर्मचाऱ्यांना काम करताना मोठा अनर्थ घडु शकतो.

गेली दोन वर्षांपासून यासंबंधीच्या तक्रारी करूनही वरिष्ठ दखल घेत नसल्याने उपोषणाचा निर्णय या कार्यालयातील कर्मचार्यांना घ्यावा लागला. आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी उपोषणा दरम्यान बसलेल्या कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी संतोष तांबे, रज्जाक शेख, अशोक गहीने, श्रीकांत पवार, राजु शेवाळे, विशाल लोखंडे, महेश अल्हाट व इतर कर्मचारी उपोषणास बसले आहेत .

'कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या अडीअडचणी वरिष्ठांना सांगितल्या असुन लवकरात लवकर उपकेंद्रातील दुरुस्तीची कामे केली जातील. तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे या दरम्यान शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.'

- शुभम पवार (कनिष्ठ अभियंता, विद्युत उपकेंद्र, रांजणी)