नागपूर

नागपूर
Published on

अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचा
‘फार्मर आयडी’ ब्लॉक करा
-----
राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांचे निर्देश ः रामटेक येथे आढावा बैठक
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
रामटेक, जि. नागपूर : ‘‘कोणत्याही पाणंद रस्त्यांवर शेतकऱ्याने अतिक्रमण करू नये. अतिक्रमण करणाऱ्यांचा ‘फार्मर आयडी’ ब्लॉक करण्यात यावा. तसेच त्यांना बोनस, पीकविमा, वीज बिलावरील अनुदान, अतिवृष्टी अथवा दुष्काळातील मदत आणि ‘एनडीआरएफ’ची मदत देऊ नये,’’ असे निर्देश राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत, पांदण रस्ते योजना तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत रामटेक येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी पियुष महाजन, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, पारशिवनीचे गटविकास अधिकारी रूपम जाधव यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे शाखा अभियंते उपस्थित होते.
जयस्वाल म्हणाले, की पूर्वी पीडब्ल्यूडीच्या निकषानुसार एका किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आता सुलभ पद्धतीचा अवलंब करून एकाच यंत्रणेला तब्बल २५ किलोमीटर रस्त्यांचे काम देण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडे जेसीबी, रोलर, व्हायब्रेटर रोलर, टिपर, पोकलेन यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने काम अधिक वेगाने आणि कमी खर्चात होत आहे.
या पद्धतीमुळे शासनाचा निधी वाचत असून केवळ ६ ते ८ लाख रुपये प्रति किलोमीटर खर्चात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होत असल्याचा दावा त्यांनी केला. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना योग्य स्लोप, पाण्याचा निचरा आणि कॉलर पाइपची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग रामटेकचे कनिष्ठ अभियंता लोकेश बनकर, पारशिवनीचे कनिष्ठ अभियंता रोहित चरपे, शाखा अभियंता एस. एम. मडावी, कनिष्ठ अभियंता मनोहर जाधव, संजय सावरकर, रंजित भगत, रंजन धनविजय, एन. एस. रामटेके, विनोद भोगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट ---
रामटेक पॅटर्न राज्यभर राबविणार
मागील अर्थसंकल्पात ‘रामटेक पॅटर्न’ राज्यभर राबविण्याची घोषणा करण्यात आली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे पालकत्व स्वीकारल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com