इंदापुरात पाणीच पाणी, खडकवासल्याच्या आवर्तनाने शेतकरी सुखावला 

विनायक चांदगुडे
Saturday, 5 September 2020

इंदापूर तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सिंचनाला आली होती. अशातच सध्या खडकवासला प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.

शेटफळगढे (पुणे) : इंदापूर तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सिंचनाला आली होती. अशातच सध्या खडकवासला प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. पिकांच्या सिंचनाच्या गरजेच्यावेळी आवर्तन आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता  29.15 टीएमसी आहे. त्यापैकी 4 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत 29 टीएमसी अर्थात 99.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे सध्या 1 हजार 79 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्याच्या हद्दीत 444 क्यूसेकने मिळत आहे. तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सिंचनाला आली होती. मात्र, कालव्याचे पाणी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या बाजरी आणि मका, कडवळ व उसाच्या पिकाला पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे. 

अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड​

यासंदर्भात खडकवासला प्रकल्पाचे इंदापूरचे उपविभागीय अभियंता परदेशी यांनी सांगितले की, खडकवासला कालव्यातून सध्या इंदापूर तालुक्यात आवर्तन सुरू आहे. याद्वारे तालुक्यातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणारे आठपैकी सहा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात आलेले आहेत. सध्या तरंगवाडी आणि भादलवाडी तलावात पाणी सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर वडापुरी तलावात पाणी सोडले जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर कालव्याच्या वितरिकांनाही पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यात हे आवर्तन आणखी सहा ते सात दिवस चालणार आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers of Indapur taluka are happy with Khadakwasla canal water