नगर- मार्चनंतरची व्याज भरण्याची गरज नाही ः जिल्हा उपनिबंधकाचे स्पष्टीकरण

नगर- मार्चनंतरची व्याज भरण्याची गरज नाही ः जिल्हा उपनिबंधकाचे स्पष्टीकरण
Published on: 

बँका, सोसायट्यांनी व्याज
मागितल्यास थेट तक्रार करा

जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश; शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे काढले पत्रक

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. या कर्जमाफीअंतर्गत मार्चअखेरपर्यंतचे व्याज आणि मुद्दल संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून याद्या जाहीर करण्याला उशीर झाला असला तरी मार्चनंतरचे कोणतेही व्याज भरण्याबाबत आदेश नसल्याने व्याज भरण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिले.
जर कोणती बॅंक अथवा सोसायटीकडून व्याज मागितले जात असेल तर व्याज देऊ नये व सबंधितांची लेखी तक्रार करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बॅंकेनेही शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे पत्रक काढल्याचे त्यांनी सांगितले.
मार्चनंतरचे व्याज वसुल केले जात असल्याबाबत काही शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’शी संपर्क साधून माहिती दिली होती. सोमवारी (ता. ९) या बाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यात शासनाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना थकीत पीककर्ज माफ झाले. त्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज द्यावे, असे आदेश आहेत. शासनाने मार्च २०२६ अखेरपर्यंतचे थकीत कर्ज आणि त्यावरील व्याज संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केले आहे. हे पैसे ऑगस्टपासून जमा व्हायला सुरुवात झाली. आता कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्याने नवीन कर्जाची मागणी केल्यानंतर एप्रिलपासून ते रक्कम जमा झालेल्या तारखेपर्यंतचे म्हणजेच साधारण चार ते पाच महिन्यांचे माफ झालेल्या रकमेवरील व्याज भरल्याशिवाय नवीन पीककर्ज दिले जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख ५८ हजार १८८ शेतकरी पात्र असून त्यातील १ लाख ४६ हजार ८९३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्यातील १ लाख ४३ हजार २९३ शेतकऱ्यांना १३६९ कोटी ६९ लाख रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली आहे. मार्च २०२६ पर्यत थकीत पीक कर्ज व त्यावरील व्याज कर्जमाफीत माफ झालेले आहे.

लेखी नव्हे तोंडी आदेश
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी पीक कर्जमाफीच्या रकमेचे एप्रिलपासूनचे व्याज सोसायटीकडून मागितले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ‘शासनाचे आदेश नाहीत, व्याज भरायची गरज नाही’ असे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा बॅंकेकडून त्याबाबत लेखी आदेश नाहीत, मात्र तोंडी आदेशाने व्याजाची वसुली सुरू आहे, असे सोसायटीतून सांगिल्याचे एक शेतकरी म्हणाला. त्यामुळे सोसायट्या शेतकऱ्यांकडून नियमबाह्य वसुली करत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.