

तुटपुंज्या मदतीविरोधात
वर्षा बंगल्यावर शुक्रवारी मोर्चा
-----
राजू शेट्टी ः कणकवलीत बागायतदारांशी चर्चा
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : कोकणातील आंबा, काजू उत्पादकांना शासनाने तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या तुटपुंज्या भरपाईविरोधात शुक्रवारी (ता. १५) गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे दिला.
कोकणातील आंबा, काजू उत्पादकांना राज्य शासनाने हेक्टरी २२ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. प्रतिझाड २२० रुपये इतकी तुटपुंजी रक्कम जाहीर करून शासनाने बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच आंब्यासाठी हेक्टरी पाच लाख तर काजूसाठी हेक्टरी तीन लाख रुपये भरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने बागायतदारांनी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे.
या संदर्भात शेट्टी गुरुवारी कणकवलीत आले होते. त्यांनी कणकवली शासकीय विश्रामगृहावर आंबा, काजू बागायतदारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक उपस्थित होते.
कोकणातील शेतकरी प्रथमच शासनाकडे मदत मागत होता. त्यामुळे शासनाने मुक्तहस्ताने मदत द्यायला हवी होती. परंतु शासनाने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये संतापाची भावना आहे, असे श्री. शेट्टी म्हणाले.
कोट ----
शासनाने बागायतदारांना तुटपूंजी मदत जाहीर केली आहे. शासनाच्या निकषानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी केवळ ७० ते ७५ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नाहीत, ही संतापजनक बाब आहे.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.