‘फास्टॅग’ची सक्ती आता होणार या तारखेनंतर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) टोल नाक्‍यांवर फास्टॅगच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शंभर टक्के टोलवसुलीचा निर्णय आता १५ फेब्रुवारीनंतर अमलात येणार आहे, अशी माहिती ‘एनएचएआय’चे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांनी दिली.

खेड-शिवापूर - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) टोल नाक्‍यांवर फास्टॅगच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शंभर टक्के टोलवसुलीचा निर्णय आता १५ फेब्रुवारीनंतर अमलात येणार आहे, अशी माहिती ‘एनएचएआय’चे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांनी दिली. 

सुमारे दीड वर्षापासून ‘एनएचएआय’च्या टोल नाक्‍यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली करण्यात येत आहे. टोल नाक्‍यांवर टोल भरताना वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. या पार्श्वभूमीवर फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली. मात्र, अजूनही फास्टॅग नसलेल्या वाहनांचे प्रमाणही अधिक असल्याने टोल नाक्‍यांवर रोख स्वरूपातही टोल स्वीकारला जात होता. त्यामुळे फास्टॅग असूनही वाहनांना टोलच्या रांगेत उभे राहावे लागत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारीपासून रोख स्वरूपात टोल वसुली बंद करून फास्टॅगच्या माध्यमातून शंभर टक्के टोल वसुली करण्याचे आदेश ‘एनएचएआय’ने दिला होता. मात्र, फास्टॅगच्या माध्यमातून शंभर टक्के टोल वसुलीला ‘एनएचएआय’कडून मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. या मुदतवाढीत वाहन चालकांना आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घेता येणार आहे. तर १६ फेब्रुवारीपासून ‘एनएचएआय’च्या सर्व टोल नाक्‍यांवर ‘फास्टॅग’द्वारे शंभर टक्के टोल वसुलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

फास्टॅगद्वारे टोलवसुलीच्या अंमलबजावणीची मुदत येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. आत्तापर्यंत सुमारे ७० टक्के वाहनांना फास्टॅग बसविण्यात आले, तर उर्वरित वाहनचालकांनी लवकरात लवकर वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावे. प्रत्येक टोल नाक्‍यावर फास्टॅग बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- सुहास चिटणीस, प्रकल्प अधिकारी, एनएचएआय

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag enforced after this date 15th February