वडिलांची इच्छा मुलांनी केली पुर्ण; शैक्षणिक संस्थेला दिली पाच लाखांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishnu Sanap Sir

वयोवृद्ध असलेल्या शिक्षकाने अंथूरणाला खिळून असताना सुद्धा माझ्या शाळेला पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्याची इच्छा मुलांकडे व्यक्त केली.

वडिलांची इच्छा मुलांनी केली पुर्ण; शैक्षणिक संस्थेला दिली पाच लाखांची देणगी

केडगाव - वयोवृद्ध असलेल्या शिक्षकाने अंथूरणाला खिळून असताना सुद्धा माझ्या शाळेला पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्याची इच्छा मुलांकडे व्यक्त केली. काही दिवसातच वडिलांचे निधन झाले अन् मुलांनी त्यांची अंतिम इच्छा पुर्णही केली. पिता पुत्रांच्या अशा अनोख्या सामाजिक बांधिलकीचे परिसरात कौतुक होत आहे.

केडगाव (ता. दौंड ) येथे नेताजी शिक्षण संस्थेचे जवाहरलाल विद्यालय १९६५ पासून सुरू आहे. विठ्ठल सानप हे शिक्षक १९७२ पासून मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागले. सानप यांनी सूत्रे घेतली तेव्हा विद्यालय भाड्याच्या एका चाळीत भरत होते. विद्यार्थी होते १५०. संस्थेचे अध्यक्ष वाघुजी शेळके व सानप दोघेही कडक शिस्तीचे. सानप यांनी परिसरात सायकलवर फिरून शाळेच्या इमारतीसाठी मदत गोळा केली. संस्थेला जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे इमारत उभी केली. शाळेला उच्च माध्यमिक विद्यालयाची परवानगी सानप यांनीच मिळवली. दहावी बारावीच्या परीक्षा केंद्र त्यांच्यामुळेच केडगावात आले. १९९८ साली सानप निवृत्त झाले. पुढे संस्थेने सुभाषअण्णा कुल महाविद्यालय सुरू केले. आज नेताजी शिक्षण संस्थेत ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

सानप यांनी माझ्या निधनानंतर कोणताही विधी करू नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार कोणतेही विधी झाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मुलगे राहुल व रवी यांनी नेताजी शिक्षण संस्थेला पाच लाख रूपयांचा धनादेश नुकताच दिला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळकेपाटील, सचिव धनाजी शेळके म्हणाले, असा शिक्षक होणे नाही. संस्थेच्या भरभराटीत सानपसर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे योगदान आम्ही कदापि विसरू शकत नाही. त्यांच्या पुरोगामी विचारांचे अनुकरण व्हायला पाहिजे.

शिक्षक चंद्रकांत दिवेकर म्हणाले, सानपसर करारी होते. विद्यार्थी व शिक्षण त्यांना खूप घाबरायचे. परंतू शिक्षकांवर संकट आले तर ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहायचे. यावेळी अशोक हंडाळ, सतीश बारवकर, राहूल पितळे, मनोज होळकर, केदार महाशब्दे, दीपक भांबरे, परिक्षित शेळके आदी उपस्थित होते.

शाळा हाच त्यांचा संसार

राहुल सानप म्हणाले, शाळा हाच त्यांचा संसार होता. आजारी असतानाही ते सतत शाळेचा विचार करायचे. त्यांच्या स्मरणार्थ दहावी, बारावी परीक्षेच्या निकालात पहिल्या तीन विद्यार्थ्यांना वडील विठ्ठल सानप यांच्या नावाने दरवर्षी बक्षीस दिले जाईल.