esakal | Pune : गृहनिर्माण संस्थांसाठी निवडणूक प्रशिक्षण ॲप
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : गृहनिर्माण संस्थांसाठी निवडणूक प्रशिक्षण ॲप

Pune : गृहनिर्माण संस्थांसाठी निवडणूक प्रशिक्षण ॲप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या (Co-operative Housing Societies) कार्यकारिणीत सहभागी नसलेल्या आणि व्यवस्थापन समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक नसलेल्या सभासदांचीच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाकडून या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष, ऑनलाइन आणि आता ॲपद्वारेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाकडून तयार केलेल्या ॲपचे उद्घाटन सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने ७ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाने अडीचशे किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेची मार्गदर्शिका तयार केली आहे. नव्या नियमावलीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेतील सभासदांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. याशिवाय सहकार विभागाच्या पॅनेलवरील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा पर्यायही आहे. मात्र, त्याबाबत व्यवस्थापन समितीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

निवडणूक प्रशिक्षणासाठी ॲप

महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले, ‘अडीचशेपेक्षा कमी सभासदांच्या सोसायट्यांची निवडणूक त्यांच्या स्तरावरच घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबई आणि ठाण्यातील दीडशे तर, पुण्यातील दोनशे गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. अ‍ॅपच्या माध्यमातूनही महासंघाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे अ‍ॅप प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून, ते डाऊनलोड करण्यासाठी प्रतिव्यक्ती शुल्क आकारण्यात येणार आहे.

त्यानंतर हे अ‍ॅप सहा दिवस मोबाइलमध्ये राहील. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये माहिती आणि चित्रफिती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’ महासंघाचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले, ‘प्रशिक्षणानंतर एक दिवस संबंधित प्रशिक्षणार्थीच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्यानंतर महासंघाकडून संबंधित व्यक्ती निवडणूक घेण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

loading image
go to top