सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला | Life Saving | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला
सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला परंतु स्थानिकांमुळे वाचला

सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला

दौंड : दौंड शहरात संथ गतीने सुरू असलेल्या अष्टविनायक मार्गावरील सांडपाण्याच्या चेंबरमध्ये एक साडेचार वर्षाचा मुलगा पडला. परंतु, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो बचावला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे.

शहरातील भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात २० नोव्हेंबर रोजी दुपारी हा दुर्देवी प्रकार घडला. अष्टविनायक मार्गांतर्गत काँक्रिटीकरण सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अंशतः बंद आहे. आरव (रा. सोलापूर) नावाचा साडेचार वर्षाचा मुलगा त्याच्या नातेवाईक असलेल्या लहान मुलांसमवेत या रस्त्यावरून जात असताना उघडा चेंबर त्याच्या लक्षात न आल्याने तो त्यात पडला. गटांगळ्या खात असतानाच स्थानिक तरूणांनी क्षणार्धात त्याला ओढून बाहेर काढले. आरव हा पूर्णपणे भेदरलेला होता परंतु त्याला समजावून शांत करून तरूणांनी त्याला पाण्याने स्वच्छ केले. एका मिनिटाचा उशीर झाला असता तर त्याला वाचविणे अवघड झाले असते.

दौंड शहरातील श्री सिंधी धर्मशाळा परिसरात वास्तव्य करणार्या मामांकडे आरव सुट्टीसाठी आलेला आहे. अष्टविनायक मार्गाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. संबंधित अधिकारी व कंत्राटदार मुजोर झाले असून ते नगरपालिकेसह कोणालाही जुमानत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दौंडचे तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय पाटील यांनी या बाबत सांगितले की रस्त्याचे काम सुरू करण्यपूर्वी गटार व अन्य कामे पूर्ण करून घेणे अभिप्रेत होते परंतु तसे न करता चेंबर उघडी ठेवण्यात आली आहेत. या बाबत कंत्राटदाराला नोटीस दिली जाईल व आणखी वाट न पाहता नगरपालिकेकडून चेंबर बंदिस्त केले जाईल.

टॅग्स :daundDrainage Line