गणेशोत्सवासह सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

गणेशोत्सवासह सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत

पुणे : कोरोनाविषयक निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सवासह इतर सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune News)

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत शुक्रवारी आढावा बैठक पार पडली. पवार म्हणाले, मागील आठवड्यात पुणे जिल्ह्याचा बाधित रुग्ण संख्येचा दर ३.१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर २.८ टक्के, पिंपरी चिंचवड २.९ टक्के आणि पुणे ग्रामीणचा ३.६ टक्के होता. ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांकरिता बेड्सचे नियोजन करण्यात आले आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडून जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी ०.१६ टक्के इतके नागरिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता खबरदारी घ्यावी. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

हेही वाचा: राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

गणेशोत्सवाबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय

गणेशोत्सवाबाबत विभागीय पातळीवर अहवाल मागवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल विभागीय स्तरावरून राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव आणि विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना दिल्या आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: जनताच कुंभकर्णासारखी झोपली; मग जाचक कायदे होणारच: अण्णा हजारे

परिवहन विभागाला वेतनासाठी पाचशे कोटी

कोरोना कालावधीत उत्पन्न घटल्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे परिवहन विभागाला पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातही वेतनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्याच्या तिजोरीतून हा निधी देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

loading image
go to top