मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असलेल्या सहकारी पत संस्थांच्या विरोधात संघर्ष करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

'राज्यात सहकारी पतसंस्थांचा मनमानी कारभार सुरु आहे. कर्जदार शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली पतसंस्थांकडून शोषण केले जाते.

Kirit Somaiya : मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असलेल्या सहकारी पत संस्थांच्या विरोधात संघर्ष करू

मंचर - 'राज्यात सहकारी पतसंस्थांचा मनमानी कारभार सुरु आहे. कर्जदार शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली पतसंस्थांकडून शोषण केले जाते. अनेकांच्या जमिनी दबावाखाली ताब्यात घेऊन त्यावर कर्जाचा बोजा चढविला जातो. पतसंस्थेच्या माध्यमातून माफिया, राजकारणी, अधिकाऱ्यांचा काळा पैसा लपवला जात असून राज्यातील सर्व पतसंस्थांची तपासणी होणे गरजेचे आहे. गैरव्यवहारात पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी सहभागी असतात.त्या विरोधात राज्यभर संघर्ष करून संबंधिताना धडा शिकवू.' असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. ५) झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे नेते जालिंदर कामठे, संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे,तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, प्रमोद बाणखेले उपस्थित होते. पत्रकार परिषदेतच १४ कर्जदारांनी मंचर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेसह आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सहा पतसंस्थांच्या कामकाजाविषयी तक्रार केली. हा संदर्भ घेऊन सोमय्या म्हणाले, 'गेली तीन ते चार वर्ष पतसंस्थाच्या कारभाराचा अभ्यास करत आहे. अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत.

धक्कादायक प्रकार ऐकून आश्चर्य वाटले. त्यामुळे मी पतसंस्थांचा कारभार चवाठ्यावर आणणार आहे. केंद्राचे सहकार खाते गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे.' संत ज्ञानेश्वर पतसंस्थेने कर्जदारांचे कोरे धनादेश आघाऊ घेतले.हा प्रकार चुकीचा आहे. मालमत्तेची मुल्यांकन चुकीची आहेत. कर्ज रक्कम पुन्हा अन्य बँकेतून पतसंस्थेत जमा होते. पतसंस्थेत आर्थिक घोटाळा झाला आहे. सहकार खात्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान मंचर येथील सहाय्यक निबंधक (सहकार) कार्यालय, पंजाब नँशनल बँक व मंचर पोलीस ठाण्यात भेट देऊन संत ज्ञानेश्वर पतसंस्थेविषयी चर्चा केली.

'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे.राजकीय क्षेत्रातील काहीजण बोलताना त्यांच्याकडून शब्द मागेपुढे होतात. आम्ही जे आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहोत. सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगावे.असे सोमय्या म्हणाले.'

आंबेगाव तालुका हा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोमय्या म्हणाले 'वळसे पाटील अतिशय सज्जन माणूस आहे.'