बारामतीत फळविक्रेत्यांची मुजोरी; लॉकडाऊनचा नियम मोडत पोलिसांना धक्काबुक्की!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

सरकारी कामात अडथळा आणण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बारामती : रस्त्यावर फळविक्रीस मनाई असतानाही विक्री करताना पोलिसांनी हटकल्याच्या कारणावरुन पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी कामात अडथळा आणण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), वैभव बाळासाहेब मदने (रा. गवारेफाटा, बारामती) व राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. 

- सोशल मीडियावर 'आपलं घरं, आपली वसुंधरा' चा ट्रेंड 

शहरात लॉकडाऊन सुरु असताना रस्त्यावर गाडी लावून खरबूज विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या तिघांना हटकले, मात्र त्यांनी पोपट नाळे यांना धक्काबुक्की करत गोंधळ घातला. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ख्रिश्चन कॉलनीनजिक छोट्या टेंपोतून खरबूज विक्री करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर या तिघांनी पोलिसांसोबत अरेरावी करत नाळे यांना धक्काबुक्की केली.

- मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणे एकाला पडले महागात

या वेळी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी हस्तक्षेप केल्यावरही मांडे हा पोलिस ठाण्यात येण्याऐवजी पळून चालला होता, त्या वेळेसही त्याने पोलिसांशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अखेर बळाचा वापर करत त्या तिघांना पोलिस ठाण्यात आणले गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight scene between Fruit seller and police in Baramati