esakal | ठाकरे सरकारकडून वाहून गेलेल्या आजी व नातवाच्या कुटुंबाला 8 लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारकडून वाहून गेलेल्या आजी व नातवाच्या कुटुंबाला 8 लाखांची मदत

वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मदतीचे धनादेश आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

ठाकरे सरकारकडून वाहून गेलेल्या आजी व नातवाच्या कुटुंबाला 8 लाखांची मदत

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

कडूस : डोंगरावरून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलेल्या कहू कोयाळी (ता.खेड) येथील भोराबाई बुधाजी पारधी (वय 43) आणि त्यांचा नातू साहिल दिनेश पारधी (वय 4) यांच्या कुटुंबाला शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मदतीचे धनादेश आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

हेही वाचा : बारामतीत एकाने सुरू केले `शोले` स्टाईल आंदोलन सुरू 

दरम्यान, गुरुवारी (ता. 22 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास चासकमान जलाशय परिसराला वादळी वारा व गारांच्या पावसाने झोडपून काढले होते. त्यात कहू कोयाळी येथील भोराबाई पारधी आणि साहिल पारधी (वय 4) हे आजी व नातू वाहून गेले होते.

वादळी पावसामुळे भोराबाई या साहिल याला घेऊन चासकमान धरणाच्या जलाशयाच्या जॅकवेलजवळच्या रस्त्यावरील मोरीपुलाच्या खाली निवाऱ्याला थांबल्या होत्या. परंतु डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात दोघेही चासकमान धरणाच्या जलाशयात वाहून गेले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सलग दोन दिवस धरणाच्या जलाशयात मृतदेहांचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले होते. या दोघा मृतांच्या वारसांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी चार लाख अशी दोन्ही कुटुंबांची मिळून एकूण आठ लाख रुपयांची मदत शासनाकडून मिळाली आहे. खेड तहसीलदार कार्यालयात या मदतीचे धनादेश कामगार तलाठी माणिक क्षीरसागर यांच्या हस्ते आपतीग्रस्त कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.

यावेळी मृत भोराबाई यांचे पती बुधाजी पारधी व साहिल याचे वडील दिनेश पारधी, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, उपसरपंच अँड.संतोष दाते, पोलिस पाटील अनिल दाते, अँड.महेश तांबे, किशोर गिलबिले, लंकू वाढाणे उपस्थित होते. 'या पैशांचा आपत्तीग्रस्त आदिवासी कुटुंबाला भविष्यात उपयोग होईल अशा पद्धतीने तरतूद करावी, अशी विनंती वजा सूचना तहसीलदार सुचित्रा आमले यांनी ग्रामस्थांना केली.

हेही वाचा  : पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

खुद्द तहसीलदारांनी दिलेल्या सुचनेबद्दल ग्रामस्थांच्या मनात तहसीलदार आमले यांच्याबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. याबाबत उपसरपंच अँड.संतोष दाते म्हणाले, 'कुठेही गेले तरी प्रशासनाबद्दल चांगले मत ऐकायला मिळत नाही. परंतु तहसीलदारांनी गरीब व आदिवासी कुटुंबाच्या भवितव्याबद्दलच्या तळमळीतूनच कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य तरतूदीची सूचना केली. ही बाब नक्कीच सुखावणारी आहे. मृतदेहांचा शोध घेण्याच्या दिवशी सुद्धा त्या उपस्थित होत्या. वारंवार सूचना करीत होत्या. उच्चपदस्थ अधिकारी असतानाही एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे तालुक्यातील गरीब कुटुंबाच्या भवितव्याविषयी त्यांनी केलेली विनंती वजा सूचना माझ्यासह ग्रामस्थांना चांगलीच भावली आहे. त्यांच्याबद्दल ग्रामस्थांना आपलेपणा वाटू लागला आहे.'

(संपादन : सागर डी. शेलार)