
मराठी शाळेत शिकणाऱ्या मात्र, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले असून, त्यांच्या नावाने थेट शाळांकडे शुल्काची रक्कम जमा करण्यात येत आहे.
पुणे - कोरोनाच्या साथीत शेकडो विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचा रोजगार गेला अन् त्यांच्या घरांवर बेकारीचं संकट ओढावलं. मग, जगायचं कसं, हा प्रश्न भेडसावत असतानाच शाळांचे "ऑनलाइन' वर्ग भरू लागले आणि शाळांच्या शुल्काचा तगादा सुरू झाला; पण जिथं रोजच्या पोटापाण्याची अडचण; तिथं शाळांचे शुल्क कोठून भरायचे, या कात्रीत सापडलेले एक हजार विद्यार्थी आता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आले.
याला निमित्त आहे ते चिंतामणी ज्ञानपीठाने हाती घेतलेल्या शैक्षणिक मोहिमेचे. या मोहिमेतून एक हजार विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यात येणार असून, त्याचा "श्री गणेशा' शुक्रवारी झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापनाकडे शुल्काचे धनादेश देण्यात आले. माजी महापौर दत्ता धनकवडे, चिंतामणी ज्ञानपीठाचे प्रमुख अप्पा रेणुसे, नगरसेवक दीपक मानकर, युवराज बेलदरे उपस्थितीत होते.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रेणुसे म्हणाले, ""मराठी शाळेत शिकणाऱ्या मात्र, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले असून, त्यांच्या नावाने थेट शाळांकडे शुल्काची रक्कम जमा करण्यात येत आहे. यात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले आहे. पुढील टप्प्यात आणखी काही शाळांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज घेतले जातील. पहिल्या टप्प्यात कात्रज, धनकवडी, आंबेगाव आणि परिसरातील मराठी शाळांत शिकणाऱ्या पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क भरण्यात येणार आहे.''
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
अजित पवार यांच्याकडून कौतुक
कोरोनाच्या साथीनंतर सर्वच क्षेत्रांना राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्य केले जात आहे. मात्र या मोहिमेत सामाजिक पुढाकारही घेतला गेला. त्यातून शैक्षणिक क्षेत्रात चिंतामणी ज्ञानपीठाने विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या उपक्रमाची व्याप्ती वाढवून सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.