esakal | आपल्या जवळचा प्लाझ्मादाता एका मिनिटात येणार शोधता
sakal

बोलून बातमी शोधा

Plasma

आपल्या जवळचा प्लाझ्मादाता एका मिनिटात येणार शोधता

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना (Patient) मोठ्या प्रमाणावर प्लाझ्माची (Plasma) गरज भासू लागली आहे. मात्र बऱ्याचवेळी रुग्णांच्या नातेवाइकांना (Relatives) धावपळ करूनही प्लाझ्मा मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून पुण्यातील रोहित खिंडकर (Rohit Khindkar) याने ‘कोविरक्षक’ (KoviRakshak) या ॲपची (App) निर्मिती केली आहे. याद्वारे मिनिटात आपल्या जवळचा प्लाझ्मादाता शोधता (Search) येणार आहे. (Find your nearest plasma donor in a minute)

रोहित हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्याचे सहकारी अक्षय लोखंडे आणि चंद्रकांत वाळके यांनी हे ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर रुग्णांना प्लाझ्मादाता मिळणे शक्य होईल.

या ॲपबाबत रोहित म्हणाला, ‘माझ्या जवळच्या नातेवाइकाला प्लाझ्मा मिळण्यासाठी सहा ते सात दिवस धावपळ करावी लागली. अनेकांना याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आले. त्यातूनच मला ‘कोविरक्षक’ची संकल्पना सुचली. या ॲपच्या माध्यमातून रुग्णांना पाहिजे असेल त्या रक्तगटातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेली व ज्यांना प्लाझ्मा दान करता येईल, अशा नागरिकांनी आपली माहिती या ॲपवर रजिस्ट्रेशन करावे. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना यातून प्लाझ्मादाते शोधणे व त्यांच्याशी संपर्क साधने अधिक सोपे होत आहे.’’

सध्या ही सुविधा फक्त पुणे जिल्ह्यात आहे. काही दिवसांत इतर जिल्ह्यांतही उपलब्ध होईल. तसेच गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांसाठीही उपलब्ध करणार असल्याचे रोहितने सांगितले.

हेही वाचा: पशुधन अधिकाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे; विमा कवच देण्याची मागणी

कोविरक्षकबाबत

  • प्लेस्टोअरवर हे ॲप मोफत

  • राज्य, जिल्हा, तालुकाप्रमाणे प्लाझ्मादात्यांची यादी उपलब्ध करून देणे

  • वेळेत प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्लॅटफॉर्म

  • सर्वांना वापरण्यास सोपे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. दररोज प्लाझ्माची वाढती मागणी लक्षात घेऊन केवळ १५ दिवसांच्या कालावधीत ‘कोविरक्षक’ हे पोर्टल तयार केले. डिजिटल युगात एका क्लिकवर रुग्णांना प्लाझ्मादाते उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे

- अक्षय लोखंडे, कोविरक्षक उत्पादन प्रमुख 

मी चार महिन्यांत तीन वेळा प्लाझ्मा दान केला आहे आणि मला कुठलाही त्रास नाही. सध्या या ॲपवर रजिस्ट्रेशन केले आहे. प्लाझ्मा दान केल्यामुळे ज्यांचे प्राण वाचले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.

- प्रा. गणेश चप्पलवार, प्लाझ्मा दाते

१०० दात्यांची नोदणी

प्लाझ्मादान करण्याची अनेकांना इच्छा असते, परंतु तो कुठे व कसा द्यायचा याची माहिती नसते, त्यामुळे ते प्लाझ्मादान करीत नाहीत. परंतु, या प्लॅटफॉर्मवर आता हे सहज शक्य झाले आहे. आतापर्यंत १०० प्लाझ्मादात्यांनी यावर रजिस्ट्रेशन केले आहे, असे तरुणांनी सांगितले.