पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-याला 70 हजारांचा दंड

पुणे : सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून त्याचा दंड न भरणा-या शंभर वाहन मालकांची यादी पुणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पहिला क्रमांक मिळणा-या बेशिस्त वाहन मालकाने तब्बल 108 वेळा वाहतुकीचे नियम मोडले असून वाहतूक पोलिसांनी त्याला 42 हजार 300 रुपयांचा ठोठावला आहे. तर सर्वांत मोठी दंडाची रक्कम 70 हजार रुपये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

108 वेळ नियमभंग केलेले वाहन हे बिबवेवाडी येथे राहणारे सोनई अमृतलाल भौरमल यांच्या नावावर आहे. तर रणधीर सिंग यांच्या नावावर असलेल्या वाहनाला 70 हजार, तर कमल एम. राजपाल यांच्या नावावरील वाहनास 53 हजार रुपयांचा दंड करण्याला आला आहे. त्यांनी अनुक्रमे 70 आणि 53 वेळा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. दंड झालेल्या या वाहन मालकांनी अद्याप एक रुपयांचा देखील दंड भरलेले नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या यादीत "सीसीटीव्ही' आणि "इ-चलन डिव्हाईसच्या माध्यमातून संबंधितांवर केलेल्या कारवाईचा समावेश असून, सर्वाधिक 108 चलन असलेल्या वाहनचालकांपासून सर्वांत कमी 44 चलन असलेल्या चालकांचा त्यात समावेश आहे.

काँग्रेसला धक्का; 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी

शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहन चालकांकडून करण्यात येणाऱ्या नियमभंगांमुळेच अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लागून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक शाखेतर्फे इ-चलन मशिनद्वारे आणि सीसीटीव्हीद्वारे कारवाई करण्यात येते. या कारवाईची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे पाठविली जाते. त्यांनी तो दंड ऑनलाइन भरणे अपेक्षित असते; परंतु बऱ्याचदा वाहन चालकांचा कल दंड न भरण्याकडे असतो. अशा प्रकारे दंड प्रलंबित असलेल्या वाहन चालकांची संख्या मोठी आहे. हा दंड वसूल करण्यासाठी सर्वाधिक चलन प्रलंबित असलेल्या शंभर जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.

येथे तपासा ऑनलाइन दंड
वाहतूक पोलिसांनी केलेला दंड तपासण्यासाठी
https://mahatrafficechallan.gov.in किंवा mahatrafficapp या मोबाईल ऍपवर माहिती तपासता येणार आहे. ही माहिती तपासण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इंजिन क्रमांक किंवा चॅसिस क्रमांकाची शेवटचे चार आकडे गरजेचे असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fine of 70 thousand for violating traffic rules